सावधान ! लॉकडाऊनमध्ये 12 -13 तास एकाच ठिकाणी बसून ऑफिसचं काम करताय ? पाठीचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं, ‘ही’ काळजी घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने देशव्यापी लॉकडाऊन सुरु आहे. यादरम्यान काही लोक वर्क फ्रॉम होम करताना कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप समोर तासनंतास बसून काम करत आहेत. पण तुमच्या बसण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळं कंबर, पाठ आणि मानेच्या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. कंबर, मान, किंवा पाठदुखीमुळे तुमच्या वर्क फ्रॉम होममध्ये अडचणी येऊ शकतात. हे टाळण्यासाठी काम करताना व्यवस्थित बसणं अत्यंत गरजेचं आहे.

1. थोड्या-थोड्या वेळानं उठा
काम करत असताना तासनं तास एकाच ठिकाणी आणि एकाच अवस्थेत बसावे लागते. हे आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक आहे. त्यामुळे वर्क फ्रॉम होम करताना शक्य असल्यास थोड्या-थोड्या वेळानं जागा बदलत रहा. तसेच काही अंतराने उठून घरामध्ये एखादा फेरफटका मारा. थोड्या-थोड्या वेळानं शरीराची हालचाल केली तर ते फायद्याचं ठरतं.

2. वाकून काम करू नका
काम करताना वाकून काम करू नका. यामुळे पाठ किंवा मानदुखीची समस्या उद्भवू शकते. तसंच अनेक तास वाकून काम केलं तर खांदेदुखी किंवा छातीत दुखण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाकण्यापेक्षा तुम्ही वापरत असलेलं उपकरण उंचावर घ्या. पण मान वर करावी लागेल इतक्या उंचीवर ठेवू नका.

3. सोफ्यावर बसून काम करु नका
सोफ्यावर बसून काम करत असाल तर तर ते टाळा. कारण सोफ्यावर कसंही बसणं होतं. त्याचा त्रास होऊ शकतो. टायपिंग करताना हात योग्य स्थितीत असणं गरजेचं आहे. त्यामुळे काम करण्यासाठी शक्यतो टेबलावर बसा.

4. हालचाल करत रहा
दीर्घकाळ एकाच ठिकाणी बसून काम करताना पायाची आणि पाठीची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी थोड्या-थोड्या वेळानं जागेवरून उठून हालचाल करत रहा. जेणेकरून हात, पाय, कंबर, पाठ आणि मानेच्या स्नायूंवर ताण असल्यास तो हलका होण्यास मदत होईल. वेळोवेळी हालचाल करत राहा. नियमित व्यायाम करा. काम करत असताना दर 20 ते 30 मिनिटांनी जागेवरून उठून शरिराची हालचाल करा.