लॉकडाऊन असताना मशिदीत नमाज पठण, पोलीस निरीक्षकासह पोलीस उपनिरीक्षक निलंबित

अहमदाबाद : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन असताना गुजरातमधील डांग जिल्ह्यात एका मशिदीत नमाज पठण करण्यात आले. हा प्रकार समोर आल्यानंतर त्या ठिकाणच्या स्थानिक पोलिसांना नमाज पठण थांबवण्यात अपयश आल्याचा ठपका ठेवत दोन पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.


डांगचे पोलीस अधीक्षक श्वेता मिशल यांनी सांगितले की, एक पोलीस निरीक्षक आणि एक पोलीस उपनिरीक्षक यांना तात्काळ निलंबीत करण्यात आले आहे. लॉकडाऊन दरम्यान जमाव जमवणे किंवा गर्दी करण्यात परवानगी नाही. याचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येईल. लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी राज्यातील विविध भागातील शहरांमध्ये हजारपेक्षा अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे.

देशात आतापर्यंत 2902 कोरोनाबाधीत रुग्ण आहेत. त्यापैकी 1023 रुग्ण हे तबलिगी जमातशी संबंधीत आहेत. शुक्रवारी लव अग्रवाल यांनी ही संख्या 647 सांगितली होती. एका दिवसात तबलिगी जमातशी संबंधीत 376 नवीन प्रकरणे समोर आली आहेत.