औरंगाबादमध्ये Lockdown जाहीर; अनेक पर्यटनस्थळे पुन्हा बंद

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोना महामारीचा विळखा अधिक घट्ट होत असल्याने शासनाने काही काही शहरात निर्बंध लागू केले असून, आता मात्र ओरंगाबाद शहराबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. औरंगाबाद शहरात लॉकडाउन लागू केले आहे. तेथील वेरुळ, अजिंठ्यासह जिल्ह्यातील अनेक पर्यटनस्थळे ४ एप्रिलपर्यंत बंद करण्याचे आदेश औरंगाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांनी दिले आहे.

दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात गुरुवारपासून काही प्रमाणात लॉकडाउन लागू केले असून आज सायंकाळी ९ वाजेपासून सर्व दुकाने बंद करण्याचे असे निर्देश ३ दिवसापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. तर त्या आदेशामध्ये बंदल करून पर्यटनस्थळे, किल्ले, स्मारके, संग्रहालये बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच दुकाने सुरू ठेवण्यासाठी कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. तर या नव्या निर्णयानुसार अंत्यविधीच्या कार्यक्रमासाठी २० पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येण्यास मनाई आहे.

तसेच, दुकानांमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाची कोरोना चाचणी करुन घेणे बंधनकारक आहे. कोरोना प्रतिजन चाचणी लवकर करून न घेतल्यास लॉकडाउनमध्ये दुकाने पूर्णत: सील करण्यात येतील. फक्त रॅपिड अ‍ॅन्टीजेन चाचणीने करून चालणार नाही तर या चाचणीनंतर RT-PCR चाचणी करुन घेणे बंधनकारक असल्याची माहिती जिल्हाधिकारी चव्हाण यांनी दिली. तसेच लॉकडाउनमध्ये नियमांचे उल्लंघन केल्यास गुन्हे दाखल केले जातील असेही त्यांनी सांगितलं आहे.