Coronavirus Lockdown ‘लॉकडाउन’मध्ये कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना वाढल्या, सर्वाधिक तक्रारी दिल्लीत

पोलीसनामा ऑनलाइन –  देशभरात कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी सरकारने लॉकडाउनचा पर्याय निवडला. त्यामुळे सगळ्यांना घरात बंदिस्त करून घ्यावे लागले आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंब एकत्र आले असून एकमेकांसोबत वेळ घालवतांच्याअनुभव सोशल मीडियातून झळकले आहेत. पण, आता लॉकडाउनमुळे आणखी एक बाब समोर आली आहे. 24 तास घरातच राहावे लागत असल्याने घरातील कुरबुरी वाढल्या आहेत. लॉकडाउन सुरू झाल्यानंतर देशभरात कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारी वाढल्या आहेत, असे राष्ट्रीय महिला आयोगाने म्हटले आहे. या यादीत बिहार आणि महाराष्ट्रातील तक्रारींची संख्या सारखीच आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी याविषयी माहिती दिली. शर्मा म्हणाल्या, ‘महिला आयोगाकडे सध्या ई-मेल द्वारे जास्त तक्रारी येत आहेत. मार्चच्या पहिल्या आठवड्यात (2 ते 8 मार्च) आयोगाकडे देशभरातून महिला हिंसाचाराच्या 116 तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर लॉकडाउनच्या कालावधीत हा आकडा दुपटीने वाढला आहे. पहिल्या दिवसांशी तुलना केल्यास (23 ते 31 मार्च) लॉकडाउनच्या कालावधीतील 10 दिवसात 257 तक्रारी आयोगाकडे दाखल झाल्या आहेत,’ अशी माहिती शर्मा यांनी दिली.

24 मार्च ते 1 एप्रिल या काळात राष्ट्रीय महिला आयोगाकडं कौटुंबिक हिंसाचाराच्या 69 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. या तक्रारींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. विशेष म्हणजे मला स्वतःला अशा तक्रारींचे ई-मेल येत आहेत.

कोणत्या राज्यातून किती तक्रारी?
कौटुंबिक हिंसाचाराच्या सर्वाधिक तक्रारी उत्तर प्रदेशातून90 तक्रारी महिला आयोगाला प्राप्त झाल्या आहेत. त्यापाठोपाठ दिल्ली 37, बिहार 18, महाराष्ट्र 18, मध्य प्रदेश 11 अशा तक्रारी आल्या आहेत. लॉकडाउन होण्याआधीच्या काळात उत्तर प्रदेश 36, दिल्ली 16, बिहार 8, मध्य प्रदेश 4 आणि महाराष्ट्रातून 5 तक्रारी दाखल करण्यात आल्या होता. तक्रारींचे हे आकडे दहा दिवसांच्या कालावधीतील आहेत.