Coronavirus Lockdown : ‘लॉकडाऊन’मध्ये घरी जाण्यासाठी ‘जीवघेणा’ प्रवास, विविध ‘क्लुप्त्या’ व ‘आयडिया’

पोलीसनामा ऑनलाईन टीम – कोरोनाचा प्रभाव टाळण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. राज्यातील संपूर्ण जिल्ह्यांच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. नागरिकांना गरज असेल तेव्हाच बाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. असे असतानाही नागरिक घरी पोहोचण्यासाठी प्रवास करण्यासाठी विविध क्लुप्त्या व आयडिया लढवत आहेत.

संचारबंदीच्या काळात कुणीही अनावश्यक प्रवास करू नये म्हणून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवस लॉकडाऊनची घोषणा केली आहे. अशा परिस्थितीमध्ये मुंबई, पुण्यासारख्या शहरातून गावाकडे जाण्यासाठी लोक जीवघेण्या मार्गांचा अवलंब करत आहेत. यात मजुरांचे प्रमाण जास्त असून आता रोजगार नाही आणि त्यातच कोरोनाची लागण होण्याच्या भीतीमुळे इतर राज्यातून मुंबईत काम करण्यास आलेल्या कामगारांनी विविध मार्गांनी शहरे सोडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. कालरात्री मुलुंड येथील आनंद नगर टोल नाक्यावर एका टेम्पोमधून थेट उत्तर प्रदेश गाठण्याचा प्रयत्न 64 जणांनी केला होता.

मात्र नवघर पोलिसांनी हा टेम्पो अडवून त्याची तपासणी केली असता ही बाब समोर आली आहे. हे सर्व कामगार असून मुंबईच्या मुंबादेवी परिसरात राहतात. तिथे हातगाडी चालवणे, तसेच इतर मिळेल ते काम करीत होते. मात्र आता हातालाच काम नसल्याने मुंबईत नक्की कसे जगावे असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. म्हणून त्यांनी अखेर टेम्पो चालक फारुख शेख यांच्या टेम्पोमधून उत्तर प्रदेश गाठण्याचा निर्णय घेतला. हा प्रवास कमीत कमी 3 दिवस चालणार होता. मात्र कमी जागेत कसेबसे कोंबून बसून या 64 जणांनी प्रवास सुरु केला खरा परंतु मुंबईच्या वेशीवरच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

या प्रकरणी टेम्पो चालक, मालक तसेच या लोकांना काम देणारे व्यक्ती अशा चार जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला असून या सर्वांना पुन्हा रात्री कुंभारवाडा येथे सोडण्यात आले. राज्य सीमाबंदी असताना पोलीस चौकी पार करून पोलिसाची नजर चूकवून हैद्राबादवरून वाशीम मार्गे राजस्थानला जाणार्‍या एका ट्रकला वाशीम शहर पोलिसांनी पकडले. आज सकाळी पोलिसांनी ही कारवाई केली. या ट्रकमध्ये एकूण 40 युवक होते. हे युवक रोजगारासाठी हैद्राबादला गेले होते. ते राजस्थानला निघाले होते.