Lockdown Effect ! एप्रिल महिन्यात देशभरात 75 लाख जणांच्या नोकऱ्यांवर ‘गदा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णसंख्याही झपाट्याने वाढत आहे. ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यानुसार, विविध राज्यांत अनेक कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. दिल्ली सारख्या इतर काही राज्यांत कडक लॉकडाऊनही लागू करण्यात आला आहे. मात्र, यामध्ये अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा आली आहे.

कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत देशव्यापी लॉकडाऊनचा निर्णय अद्याप घेतला गेला नाही. तरीही इतर काही राज्यांत अनेक कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे फक्त एप्रिल महिन्यात देशभरात 75 लाखांहून अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. या कडक निर्बंधांमुळे आता बेरोजगारीचा दर आठ टक्क्यांवर पोहोचला आहे. हा गेल्या चार महिन्यांतील उच्चांक आहे. याबाबतची माहिती ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’ (CMIE) या संस्थेने दिली आहे.

‘मार्च महिन्याच्या तुलनेत एप्रिल महिन्यात 75 लाख जणांनी नोकऱ्या गमावल्या. त्यामुळे बेरोजगारीचा दर वाढला आहे. आगामी काळातही रोजगाराच्या अनुषंगाने स्थिती आव्हानात्मक राहणार असल्याची भीती आहे, असे CMIE चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक महेश व्यास यांनी सांगितले.

दरम्यान, राष्ट्रीय बेरोजगारी दर 7.9 टक्क्यांवर पोहोचला आहे. शहरी भागात हा दर 9.78 टक्क्यांवर असून, ग्रामीण भागात तो 7.13 टक्क्यांवर आहे. यापूर्वी मार्च महिन्यात राष्ट्रीय बेरोजगारी दर 6.50 टक्के होता. तसेच ग्रामीण आणि शहरी या दोन्ही भागांत बेरोजगारीचा दर कमीच होता, असे केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार स्पष्ट होत आहे.