Coronavirus Updates : संपुर्ण देशात पुन्हा लागणार Lockdown? अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले सूचक संकेत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरात कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढत असल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे. देशात रुग्ण मोठ्या संख्येने सापडत असल्याने देशपातळीवर लॉकडाऊनची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लॉकडाऊनबाबत सूचक संकेत दिले आहेत. त्या म्हणाल्या की, देशात कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत असली तरी लॉकडाऊन लावण्याचा केंद्राचा कुठलाही विचार नाही. आम्हाला अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प करायची नाही. त्यामुळे गेल्यावर्षीप्रमाणे आता संपूर्ण देश लॉक होणार नाही. कोरोनाला रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर विशेष पावले उचलली जातील. मात्र लॉकडाऊन लावले जाणार नाही, असे सीतारामण यांनी स्पष्ट केले आहे.

अर्थ मंत्रालयाने याबाबत ट्विट करत कोरोनाला रोखण्यासाठी 5 सुत्री रणनीती आखत तपासणी, माहिती घेणे, उपचार करणे, लसीकरण आणि कोरोना रोखण्यासाठी देशात सुरू असलेल्या माहितीचे विवरण प्रसिद्ध केले आहे. देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दुसऱ्या लाटेदरम्यान अनेक राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णवाढीचा वेग प्रचंड वाढला आहे. यात महाराष्ट्रासह छत्तीसगड, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश आहे. दरम्यान गेल्या 24 तासांत देशभरामध्ये कोरोनाचे 1 लाख 14 हजार रुग्ण सापडले आहेत. तर मृतांची संख्याही एक हजाराच्या वर गेली आहे. दरम्यान महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी रात्री जनतेला संबोधित करताना आज रात्री आठ वाजल्यापासून 15 दिवसांच्या कठोर निर्बंधांची घोषणा केली आहे.