Coronavirus : ‘कोरोना’ग्रस्त रूग्णांच्या मृत्यूसंख्येत भारतानं चीनला देखील टाकलं मागे

पोलिसनामा ऑनलाईन टीम – देशात कोरोनाचा कहर वेगाने वाढत असून आतापर्यत बाधितांची संख्या 1 लाख 65 हजारांवर पोहोचली आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत भारत नवव्या स्थानावर पोहोचला आहे. चिंताजनक बाब म्हणजे कोरोनाबाधितांच्या मृत्यूसंख्येत भारताने चीनलाही मागे टाकले आहे. चीनच्या तुलनेत भारतात जवळपास दुप्पट कोरोनाबाधित रुग्ण आहेत. भारतातील मृतांची संख्या 4 हजार 711 झाली असून चीनलाही मागे टाकले आहे. चीनमध्ये 4 हजार 634 जणांचा मृत्यू झाला आहे.

चीनमध्ये डिसेंबर महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. यानंतर जगभरात करोनाचा फैलाव झाला असून आतापर्यंत 59 लाख लोकांना करोनाची लागण झाली आहे. तर साडे तीन लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. जगातील अनेक देशांमध्ये अद्यापही कोरोनाने थैमान घातले असताना चीनमधील रुग्णसंख्या मात्र कमी होत असून गेल्या अनेक दिवसांत फार कमी प्रकरणे समोर आली आहे.

कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला असून 17 लाख रुग्ण आहेत. कोरोनाबाधित रुग्णसंख्येत भारत नवव्या स्थानी असून भारताच्या आधी ब्राझिल, रशिया, इंग्लंड, स्पेन, इटली, फ्रान्स आणि जर्मनीचा क्रमांक आहे. चीन 14 व्या क्रमांकावर असून तुर्की, इराण आणि पेरु अनुक्रमे 10, 11 आणि 12 व्या क्रमांकावर आहेत. मृत्यूंच्या संख्येतही अमेरिकाच पहिल्या क्रमांकावर असून आतापर्यंत 1 लाखाहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर अनुक्रमे इंग्लंड, इटली, फ्रान्स, स्पेन, ब्राझिल, बेल्जिअम, मेक्सिको, जर्मनी आणि इराण पहिल्या 10 देशांच्या यादीत आहेत.