धक्कादायक ! IAS अधिकार्‍याकडून तबलिगींचा ‘हिरो’ म्हणून उल्लेख, सरकारनं पाठवली कारणे दाखवा नोटीस

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोनात भटंकती केल्यानंतर तबलिगी जमातच्या सदस्यांचे कौतुक करत त्यांचा हिरो म्हणून उल्लेख करणार्‍या कर्नाटकमधील आयएएस अधिकार्‍याला राज्य सरकारने कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. मोहम्मद मोहसीन असे अधिकार्‍याचे नाव आहे.

मोहसीन यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत तबलिगी जमातच्या सदस्यांचं कौतुक केले होते. त्यांनी पोस्टमध्ये, उपचार घेऊन बरे झालेले तबलिगी जमातचे सदस्य प्लाझ्मा उपचारासाठी पुढाकार घेत असून ते हिरो आहेत आणि त्यांच्या या योगदानाकडे दुर्लक्ष केले जात आहे. 300 हून अधित तबलिगी हिरो प्लाझ्मा थेरपीसाठी पुढाकार घेत असून देशाची सेवा करत आहेत. पण मीडियाचे काय ? या हिरोंकडून मानवतेसाठी केले जाणारे काम ते दाखवणार नाहीत, असे ट्विट मोहम्मद मोहसीन यांनी केले होते. त्यानंतर कर्नाटक सरकारने या ट्विटची दखल घेतली असून मोहम्मद मोहसीन यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. 30 एप्रिल रोजी ही नोटीस बजावण्यात आली असून मोहम्मद मोहसीन यांना उत्तर देण्यासाठी पाच दिवस देण्यात आले आहेत. योग्य उत्तर न दिल्यास कारवाई करण्यात येईल असाही उल्लेख नोटीसमध्ये करण्यात आला आहे.

दरम्यान, मोहसीन यांना नोटीसबद्दल विचारण्यात आले असता, त्यांनी कोरोनासंबंधीच्या हेल्पलाइन क्रमांकाची माहिती देण्यासाठी जवळपास 40 ते 50 पोस्ट केल्या आहेत. मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करण्याचे आवाहनही केले आहे. मोहसीन याआधी ओडिशा येथील प्रचारसभेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हेलिकॉप्टरची तपासणी करण्याचा आदेश दिल्याने चर्चेत आले होते. यावेळी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.