Coronavirus : चिंताजनक ! महाराष्ट्रात ‘कोरोना’बधितांची आकडा 6500 वर

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनामुळे महाराष्ट्र राज्यात चिंताजनक परिस्थिती असून गुरुवारी एकाच दिवसात कोरोनाचे 778 नवे रुग्ण सापडले आहेत. आतापर्यंतची ही सर्वात मोठी संख्या असून रूग्णसंख्या 6 हजार 427 पोहोचली आहे. तर मृत्यू झालेल्यांची संख्या 283 आहे. गुरुवारी 14 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 840 रुग्णांना उपचार करुन घरी सोडण्यात आले आहे.

राज्यातील विविध भागात कोरोनामुळे झालेल्या 14 मृत्यूमध्ये आठ पुरुष तर सहा महिला होत्या. यामधील दोघांचे वय 60 च्या पुढे होते. तर नऊ जणांचे वय 40 ते 59 दरम्यान होते कोरोनाचा हॉटस्पॉट असणार्‍या मुंबईत आणखी 478 रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंतची एका दिवसातील ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. त्यामुळे मुंबईतील रुग्णांचा एकूण आकडा 4 हजार 232 वर गेला आहे. दिवसभरात 8 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या 168 वर गेली आहे. मुंबईमध्ये दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. सध्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 3 हजार 593 इतका आहे. तर आणखी 278 संशयित रुग्ण दाखल केलेले आहेत. मुंबईत 92 हजार 112 व्यक्तींचे घरातच अलगीकरण केलेले आहे. त्यापैकी 18 हजार 807 लोकांनी 14 दिवसांचा अलगीकरणाचा काळ पूर्ण केला आहे. तर अजून सुमारे 74 हजार लोक अजून घरीच अलगीकरणात आहेत. महाराष्ट्रात 96 हजार 369 नमुन्यांची चाचणी करण्यात आलेली असून यापैकी 89 हजार 561 जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे तर 6 हजार 427 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सध्या राज्यात एकूण 1 लाख 14 हजार 398 लोक घऱात विलगीकरणात असून 8 हजार 702 लोक संस्थात्मक विलगीकरणरणात आहेत.