… म्हणून रेल्वेतील चेन ओढून मजुरांनी श्रमिक ट्रेनमधून उड्या मारल्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – मूळगावी परतल्यानंतर क्वारंटाईनच्या भीतीने श्रमिक ट्रेनमधून उडी मारण्यासाठी मजुरांनी एमर्जन्सी चेन खेचल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रेल्वे आणि आसाम पोलिसांनी कारवाई करत 61 जणांना अटक केली आहे. तर दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही ट्रेन मुंबईहून आलेली होती.

ट्रेन मुंबईहून आसाम येथील दिब्रुगढ येथे चालली होती. ही लोकमान्य टिळक श्रमिक ट्रेन आसाममधील होजाई रेल्वे स्थानकाजवळ पोहोचल्यानंतर चेन खेचण्याचे मजुरांनी ठरविले होते. घटना घडली त्याच रात्री रेल्वे सुरक्षा दलाने कारवाई करत होजाई रेल्वे स्थानकावर उतरलेल्या 56 प्रवाशांना अटक केली. तर इतरांना आसाम पोलिसांनी रेल्वे सुरक्षा दलाच्या सहाय्याने बुधवारी सकाळी अटक केली. ट्रेनमधून पळ काढलेल्या एका प्रवाशाला होजाई मार्केटमधून अटक करण्यात आली. सर्व मजूर मुंबईहून परतलेले असल्याने घटनेची माहिती मिळताच होजाई रेल्वे स्थानकावर एकच गोंधळ आणि भीती निर्माण झाली. मुंबई करोनाच्या हॉटस्पॉटच्या यादीत असून 40 हजाराहून जास्त रुग्ण आढळले आहेत.

मुंबईहून हजारो, लाखोंच्या संख्येने मजूर आपल्या राज्यात परतत आहेत. आसाममध्येही करोनाच्या रुग्णांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढ पहायला मिळत आहे. बुधवारी आसाममध्ये 111 जण करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यासोबत करोनाबाधित रुग्णांची संख्या 1 हजार 672 वर पोहोचली आहे. तर चार जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.