‘कोरोना’च्या संकटा दरम्यानच MIM च्या आमदाराचा धक्कादायक प्रकार !

पोलीसनामा ऑनलाइन – देशासह महाराष्ट्राला कोरोना व्हायरसचा विळखा घट्ट झाला आहे. खबरदारी म्हणून लोकांनी घरातच राहावे, असे वारंवार आवाहन केले जात आहे. परंतु, मालेगावमध्ये एमआयएमच्या एका आमदाराने कहर केला आहे. एमआयएमचे आमदार मुफ्ती इस्माईल यांचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. 14 दिवसांसाठी होम क्वारंटाइन असतांना देखील लोकांमध्ये जाऊन साहित्य वाटप केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. साहित्य वाटप करतानाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे.

आमदार मुफ्ती हे दिल्ली मार्गे सहारनपुरला जाऊन आले होते. त्यामुळे त्यांना 14 एप्रिल पर्यंत होम क्वारंटाइन करण्यात आले होते. तरी देखील त्यांनी बाहेर पडून लोकांना साहित्य वाटप करून इतरांचा जीव धोक्यात घातला आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच महापालिका आयुक्त किशोर बोर्डे यांनी याची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहे. या अगोदर देखील त्यांनी कार्यकर्त्यांसोबत जाऊन सामान्य रुग्णलायत जाऊन गोंधळ घातला होता.

या प्रकरणी त्यांच्या विरुद्ध गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. आमदार मुफ्ती हे वारंवार मनमानी करत असल्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. याआधीही आमदार मुफ्ती इस्माईल यांनी आपल्या समर्थकांसह सामान्य रुग्णालयात गोंधळ घातला होता. या प्रकरणी त्यांच्यासह 10 समर्थकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुफ्ती यांच्या समक्ष समर्थकांनी सामान्य रुग्णायलातील वैद्यकीय अधिक्षकासह इतर डॉक्टर आणि कर्मचार्‍यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की आणि मारहाण केली होती. त्यामुळे रुग्णालयात काही काळ तणाव निर्माण झाला होता. डॉक्टर आणि इतर कर्मचार्‍यांनी काम बंद आंदोलनही केले होते.