Lockdown : ‘कोरोना’च्या संकटातही खा. सुप्रिया सुळे मदतीला सरसावल्या, VC व्दारे कार्यकर्त्यांच्या संपर्कात, कामाचा घालून दिला ‘आदर्श’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सतत गावभेटींचे कार्यक्रम घेऊन आपल्या मतदार संघातील एकूण एक गावांतील नागरिकांच्या समस्या जाणून घ्यायला आणि त्यावर मार्ग काढायला सुप्रिया सुळे कधीही थकत नाहीत. त्यामुळेच त्यांची कार्यकर्ता टीम सुद्धा सतत ऍक्टिव्ह असते. सध्या टाळेबंदी असली तरी त्यावरही मात करत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्या आणि त्यांची संपूर्ण टीम सतत एकमेकांच्या संपर्कात असून ठिकठिकाणी अडचणीतील नागरिकांना मदत करण्याचे काम सुरूच आहे. बारामती तालुक्यातील नागरिकांच्या रेशन आणि अन्य समस्या आज सोडविण्यात आल्या.

प्रत्येक गोष्टीत आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या सुळे या रोजच्या रोज तालुका पातळीवरील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी तसेच तेथून गाव पातळीवरील कार्यकर्त्यांशी बैठका घेत आहेत. आतापर्यंत बारामती, दौंड, इंदापुर आणि खडकवासला विधानसभा मतदार संघातील तालुका अध्यक्ष आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या ऑनलाईन बैठका झाल्या आहेत. या बैठकांत तालुक्यातील बहुतांश गावे आणि तेथील समस्या जाणून घेत आवश्यक सूचना दिल्या. कोरोना साथीशी संबंधित तपासण्या होत आहेत का, गाव पूर्ण लॉकडाऊन आहे, की अंशतः आहे, दैनंदिन व्यवहार कसे सुरू आहेत, या टाळेबंदीमुळे गावांतील गोरगरीब नागरिकांच्या जीवनावश्यक गरजा भागत आहेत का, असतील तर काय उपाय केलेत, नसेल तर काय उपाय करता येईल, तेथून जवळ आपले कोणी पदाधिकारी आहेत का, त्यांना एखादी समस्या सोडवता येईल का, अशी अगदी बारकाईने माहिती घेऊन सुप्रिया सुळे आवश्यक सूचना देत आहेत.

समस्या जाणून घेत असताना त्या त्या विषयानुसार लागलीच तेथुनच बीडीओ, तहसीलदार, जिल्हानपरिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपासून अगदी जिल्हाधिकारी आणि राज्याच्या मुख्य सचिवांना सुद्धा फोन केले जातात. त्यांच्याशी संपर्क साधून काय विषय आहे, कोणत्या ठिकाणचा आहे, कसा मार्ग काढता येईल, याच्यावर चर्चा होऊन पुढील अर्ध्या ते एक तासात संबंधित ठिकाणी मदत पोहोच सुद्धा होत आहे. इतक्या तातडीने मदत आणि सहकार्य होत असल्याने नागरिकांमधून सुप्रिया सुळे यांच्याबद्दल मोठ्या प्रमाणावर आदर आणि आभाराची भावना उमटत आहे.

बारामती लोकसभा मतदार संघातील प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय ऑनलाइन बैठकांचे नियोजन करण्यात आले असून या बैठकांशिवाय संपूर्ण मतदार संघातून कोठूनही काही अडचणीबाबत माहिती मिळताच तत्काळ त्या त्या विषयाशी संबंधितांशी संपर्क साधून आवश्यक त्या सूचना देण्यात येत आहेत. याशिवाय मतदार संघातील युवक, युवती, अंगणवाडी सेविका, विद्यार्थीं संघटना तसेच सोशल मीडिया टीमच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांच्या अडीअडचणी त्या जाणून घेत आहेत.

कार्यकर्त्यांत चैतन्य; कामाचा हुरूप
रोज नित्य नेमाने आपल्या नेत्यांजवळ राहणे, त्यांच्या सूचनांचे पालन करणे, त्यांना भेटणे, त्यांचे मार्गदर्शन घेणे यात कार्यकर्त्यांना मोठा आनंद असतो. तथापि टाळेबंदीमुळे हा नैमित्तिक संपर्क जवळपास बंदच झाला होता. मात्र त्यावर मात करत सुप्रिया सुळे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे आपल्या टीम मधील प्रत्येक पदाधिकारी एकत्र जोडला आहे. परिणामी रोज आपल्या नेत्यांशी आपण थेट बोलतोय आणि त्यांनी सांगितल्यानुसार काम करतोय, याचे आगळेच समाधान कार्यकर्त्यांत व्यक्त होत असून कामाचा हुरूप आल्याचे ते सांगत आहेत.

 

आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील खडकवासला विधानसभा मतदारसंघातील (शहरी भाग) Nationalist Congress Party – NCP चे नगरसेवक व पदाधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली.यावेळी मतदारसंघातील रेशन धान्य वाटपासंदर्भात सखोल चर्चा झाली. पुरवठा विभागाच्या अधिकारी अस्मिता मोरे यावेळी उपस्थित होत्या.

कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर लॉकडाऊन झाल्याने लोकांना अन्नधान्य मिळण्यात अडचणी येऊ नयेत.तसेच केशरी कार्डधारकांना स्वस्त धान्य दुकानात धान्य मिळणार आहे.हे वितरण अधिक चांगल्या पद्धतीने करण्याचे ठरविण्यात आले.एकही व्यक्ती अन्नधान्यापासून वंचित राहू नये यासाठी शासन कटीबद्ध आहे.
या चर्चेत सहभागी झालेल्या सर्वांनीच अभ्यासपूर्वक मुद्दे मांडले.हे सर्वजण आपापल्या भागात उत्तम काम करीत आहेत.आजच्या चर्चेचा मतदारसंघातील व राज्यातील गरजूंना अवश्य फायदा होईल असा विश्वास आहे.सर्वांनी या चर्चेसाठी वेळ दिला याबद्दल सर्वांचे मनापासून आभार.