Coronavirus Impact : मुंबईत गणेशोत्सव साजरा करण्यासंबंधी मोठा निर्णय !

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनामुळे मुंबई आणि पुणे येथील परिस्थिती चिंताजनक आहे. लॉकडाउन होऊन 40 हून अधिक दिवस झाले असून राज्यातील 14 हून अधिक जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. मात्र आता निर्बंध शिथील केले जात असून जनजीवन पुन्हा एकदा पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्रा, याचा परिणाम गणेशोत्सवावरही झाला असून उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यासंदर्भात सूचना करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. गणेशोत्सवादरम्यान मुंबई, पुणे येथे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी असते. पण कोरोनाला रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळणे महत्त्वाचे असल्याने गणेशोत्सव साजरा होणार की नाही याबद्दल अनेकांच्या मनात प्रश्नचिन्ह आहे. अनेकांना गणेश चतुर्थीपर्यंत परिस्थिती सामान्य होईल असा विश्वास वाटत आहे. दुसरीकडे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीदेखील गणेशोत्सव कोणत्याही परिस्थितीत साजरा होईल असा आत्मविश्वास व्यक्त करत आहे. मात्र यावेळी गणेशोत्सव नेहमीप्रमाणे साजरा न होता अत्यंत साधेपणाने साजरा केला जाणार आहे.

बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेंद्र दहीबावकर यांनी सर्व मंडळांना गणेशोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने तयारी करण्यास सांगितले आहे. पण दरवर्षीप्रमाणे थाटामाटात न करता अत्यंत साधेपणाने गणेशोत्सव साजरा केला जाईल असेही त्यांनी मंडळांना सांगितले आहे. काही वर्षांपूर्वी प्लेगची साथ आली होती. त्यानंतरही लोकांना आपल्या घरी गणपतीची मूर्ती आणून साधेपणाने 11 दिवस गणेशोत्सव साजरा केला होता, असेही दहीबारवकर यांनी सांगितले आहे.

संकटाच्या काळात गणेशोत्सव मंडळांनी नेहमीच प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून काम केले आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलीस पालिकेवर मोठा ताण आहे. यामुळे यावेळीही गणेश मंडळं आपली मदतीची परंपरा कायम ठेवणार आहेत. लोकांना कमी गर्दी करण्याचं आवाहन करण्यात येणार असून गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती दहीबावकर यांनी दिली आहे.