पुणे : रिक्षा, टॅक्सी आणि चारचाकीमधून फक्त चालकासह 3 व्यक्तींनाच प्रवेश करण्याची परवानगी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   शहरातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता आता शहरात रिक्षा, टॅक्सी आणि चारचाकी कारमधून फक्त चालकासह तीन व्यक्तींनाच प्रवेश करण्याची परवानगी असणार आहे. तर लग्न समारंभ व इतर कार्यक्रमासाठी 50 पेक्षा जास्त व्यक्ती जमविण्यास देखील मनाई केली आहे. पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी माहिती दिली आहे.

शहरात गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्याला रोखण्यासाठी जिल्हा, पालिका आणि पोलीस प्रशासन काम करत आहे. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर मोठ्याप्रमाणात नागरिक बाहेर पडत आहेत. रस्त्यावर गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे आता पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलत पुन्हा एकदा रिक्षा, टॅक्सी आणि चारचाकी वाहनांसाठी नियम केले आहेत.

त्यानुसार शहरात येथून पुढे रिक्षा, टॅक्सी आणि चारचाकी वाहनातून प्रवास ड्रायव्हरसह तीन व्यक्तींना करता येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी याचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तर लग्न समारंभ तसेच इतर सार्वजनिक व घरघुती कार्यक्रमाला 50 व्यक्तीं जमविण्याचे बंधन घालण्यात आले आहे. अन्यथा पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी या सूचनांचे पालन करावे असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.