Coronavirus Impact : उन्हाळा सुरू पण ना ऊसाचा रस ना लिंबू सरबत अन् नीरा विक्री

पुणे : प्रतिनिधी – कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी देश लॉकडाऊन केला गेला. त्यामुळे उन्हाचा कडाका वाढला मात्र, घुंगराच्या आवाजात घसा थंड आणि गोड करणारा उसाचा रस यावर्षी दूर गेल्याचे चित्र दिसत आहे. आज प्रत्येकाची जीवन-मरणाची लढाई सुरू झाली आहे. रोजगारापेक्षा जगण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू झाली आहे.

उन्हाचा कडाका जाणवू लागला की, एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच दुपारच्या वेळी पावले उसाच्या गुऱ्हाळाकडे वळतात. रस्त्याच्या कडेला, गर्दीच्या ठिकाणी लाकडी, तसेच यंत्रवत चरख्यातून उसाचा रस बर्फ टाकून ग्लासमध्ये भरून घेतल्याशिवाय थंडाव्याची मजा मिळत नाही. यंत्रवत चरख्याला छानशी घुंगरी बांधलेली असतात, चरखा सुरू झाला की, घुंगराचा आवाज कानी पडतो. रस्त्याने ये-जा करणाऱ्यांनाही तो उसाच्या रसाचा आस्वाद घ्यायला असे खुणावताना दिसतो. मात्र, यावर्षी कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे रस्ते, शहर सामसूम झाले आहे. कुठेही उसाचा रस, लिंबू सरबत, नीरा विक्री करणारी मंडळी दिसत नाहीत.

सोलापूर रस्त्याच्या दुतर्फा अनेक ठिकाणी हातगाडीवर टिपिकल लाकडी चरखा आणि त्यामध्ये उसाच्या मोळ्या ठेवलेल्या असे दृश्य दिसते. उन्हाळा सुरू झाला की, ग्रामीण भागातील पती-पत्नी मंडळी रोजगार मिळविण्यासाठी म्हणा किंवा पोटापाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी येतात. महिना-दोन महिने हा व्यवसाय करतात आणि परत जातात. मात्र, यावर्षी उन्हाळा सुरू होण्याअगोदरच देश लॉकडाऊन केला आहे. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी संपर्क बंद झाला आहे. शाळा-महाविद्यालये, कंपन्या, व्यवसायसुद्धा बंद आहेत. त्यामुळे अनेकांनी गावाकडे धूम ठोकली आहे, तर काहींनी येथेच राहणे पसंत केले आहे. कारण आज नाही तर उद्या लॉकडाऊन संपेल आणि पुन्हा पुन्हा आपले जीवन पुर्ववत होईल, अशी प्रत्येकाला आशा आहे.

थंड पेयांपेक्षा स्वस्त
उन्हाच्या काहिलीमध्ये जीव कासावीस झाल्यानंतर घशाला आणि मनाला थंडावा देणाऱ्या उसाचा ताजा रस पिण्यासाठी गुऱ्हाळामध्ये सामान्य नव्हे सर्वच मंडळी गर्दी करतात. कारण उन्हाच्या चटक्यामुळे खिशाला परवडणारा उसाचा रस प्रत्येकाला हवाहवासा वाटत असतो. त्यामुळे प्रत्येकजण उन्हात भरदुपारी एखाददुसरा ग्लास तरी उसाचा रस घेतल्याशिवाय पुढे जात नाही, असे मागिल वर्षी सोलापूर रस्त्यावर गुन्हाळ चालविणाऱ्यांनी संपर्क साधला असता सांगितले.