‘कोरोना’मुळे आंबा खाणे झाले दूरापास्त, पोलिसांचा खडा पहारा ! बाजारात आंबाही दिसत नाही

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अक्षय तृतियेच्या दिवशी पूर्वजांच्या पुण्यतिथीनिमित्त आंब्याचा नेवेद्य दाखवून आंबा खाण्याची परंपरा रूढ आहे. मात्र, यावर्षी कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे सर्वत्र सन्नाटा पसरला आहे. बाजारपेठ ठप्प असल्याने खरेदी-विक्री व्यवहारही बंद आहेत. त्यामुळे यावर्षी अक्षयतृतियेला आंबा खाण्याचा मुहूर्त टळणार हे निस्चित आहे. रत्नागिरी, देवगड आंब्याची आवक झाली नसल्याने बाजारात आंबा नाही. देसभर लॉकडाऊन असल्यामुळे पोलिसांचा खडा पहारा आहे. त्यामुळे आंबा खरेदीसाठी बाजारात जाणेही बहुतेकांनी टाळल्याचे चित्र दिसत आहे.

हडपसरमधील आंबा विक्रेते केदार बिडवई म्हणाले की, आंब्याला भरपूर मागणी आहे. मात्र, 100 टक्क्यांऐवजी फक्त 10 टक्के माल आला आहे. आम्ही 500 पेट्यांची मागणी केली होती, तर फक्त दोनशे पेट्यांची आवक झाली आहे. अक्षय तृतियेला फळांचा राजा आंबा याला मोठी मागणी असते. अक्षय तृतियेपासून आंबा खाण्याला सुरुवात केली जात असल्याची परंपरा आपल्याकडे रूढ आहे. लॉकडाऊन असूनही आंबा खरेदीसाठी ग्राहक मोठ्या संख्येने येत आहेत. लॉकडाऊन उठल्यानंतर आंब्याची आवक वाढल्यानंतर मागणी तसा पुरवठा करता येईल, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, काही नागरिकांनी सांगितले की, यावर्षी आंब्याविनाच अक्षय तृतीया साजरी करण्याचा पहिलीवहिली वेळ आहे. आंबा महत्त्वाचा नाही, तर कोरोना घालवून जीवन महत्त्वाचे आहे, अशीही भावनिक टिपण्णी त्यांनी दिली.

अक्षय तृतीयेच्या दिवशी दानधर्म करणे श्रेष्ठ मानले जाते. वैशाख महिन्यात सूर्य प्रकाशाची उष्णता आणि उन्हाळा सर्वत्र असल्याने लाही लाही होते. त्यासाठी या दिवशी थंड पाणी, कलश, तांदूळ, हरभरा, दूध, दही, कपड्यांचे दान करणे शुभ व अमीट पुण्य आहे. जे लोकं या दिवशी आपले चांगले भाग्य इतरांना वाटतात त्यांना देवाचे आशीर्वाद लाभतात. या दिलेल्या दानापासून अक्षय फळाची प्राप्ती होते. सुख, समृद्धी आणि सौभाग्य मिळावे म्हणून या दिवशी शिव-पार्वती आणि नर-नारायण यांची उपासना करण्याचा नियम आहे.

ह्या दिवशी गौरीचे महत्व असल्याने या दिवशी गृहस्थांच्या जीवनात आनंद आणि शांती मिळविण्यासाठी केलेल्या प्रार्थना त्वरीत स्वीकार केल्या जातात. गृहस्थांचे कष्टमुक्त जीवन ठेवण्यासाठी या दिवशी गौरीची पूजा केली जाते. अक्षय तृतीयेच्या दिवशी गाय, जमीन, तीळ, सोनं, तूप, कापड, धान्य, गूळ, चांदी, मीठ, मध, मोठं, खरबूज, मुलगी (कन्यादान) या 14 वस्तूंचे दान देणे महत्वाचे आहेत.

आंबे व घटांना मागणी
अक्षय तृतीयेला पूर्वजांच्या स्मरण दिनानिमित्त मातीचा घट (भांडे) सुगंधी पाण्यासह दान करण्याची प्रथा आहे; तसेच आंबे खाण्याची सुरुवातही याच दिवसापासून करण्याची प्रथा रूढ झाली आहे. मात्र, त्याआधी त्यांचे दान केले जाते. चैत्रगौरींचे पूजन व हळदी-कुंकू समारंभांचा समारोपही अक्षय तृतीयेला होत असल्याने कैरीची डाळ व पन्हे यासाठी हरभरा डाळ व कैऱ्यांनाही मागणी होती. भाजी विक्रेत्यांनी आवर्जून कैऱ्या विकण्यासाठी आणण्यास सुरूवात केली आहे. मात्र, कोरोनामुळे त्यांना मागणी मात्र कमी आहे. अनेक महिलांनी चैत्रगौरी हळदी-कुंकूही मोजक्याच महिलांच्या उपस्थितीत करण्यास प्राधान्य दिले आहे.