Coronavirus Lockdown : उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब शहरात ‘लॉकडाऊन’चा बोजवारा !

कळंब : पोलिसनामा ऑनलाइन – उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब शहरात संचारबंदीचा बोजवारा उडाल्याचे चित्र पाहिला मिळाल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहेत. नागरिक भाजीपाला घेण्याच्या नावाखाली तोबा गर्दी करत असताना पोलीस प्रशासन मात्र बग्याची भूमिका घेत आहे. जिल्ह्यात कोरोनाचे तीन रुग्ण आढळून आले असताना हा हलगर्जीपणा होत आहे.

देशभरात कोरोना आजाराने थैमान घातले आहे. राज्यात संचारबंदी लागू केली आहे. नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई केली आहे. कोरोना रुग्णाची संख्या राज्यात झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे प्रशासन सर्व उपाययोजना करत आहे. नागरिकांना सतत घरात राहण्यास सांगितले जात आहे. ग्रामीण भागात याचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी वेगवेगळ्या प्रकारे काळजी घेतली जात आहे. त्यासाठी जिल्हा बंदी घालण्यात आली आहे.

मात्र ग्रामीण भागात याचे महत्त्व अजून देखील कळले नसल्याचे दिसत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात 3 कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे गेली दोन दिवस जनता कर्फ्यु पाळण्यात आला. सोमवारी ह जनता कर्फ्यु झाल्यानंतर मात्र जिल्ह्यातील कळंब शहरात भाजीपाला घेण्याच्या  नावाखाली शेकडो लोक रस्त्यावर उतरले. आणि तोबा गर्दी केली. त्यामुळे या संसर्गाचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रशासन आणि पोलीस देखील याला मुख संमती असल्यासारखे काहीच करत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे धोका वाढल्यास याला जबाबदार कोणाला धरणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

दरम्यान तालुक्यात पुणे, मुंबई, सांगली अश्या शहरात नोकऱ्या करणारे जवळपास 10 हजाराहून अधिक नागरिक दाखल झाले आहेत. त्यात अनेकजणांना होम क्वाराटाईनचे शिक्के मारले आहेत. तेही नागरिक बाहेर पडत आहेत. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

उपविभागीय अधीकारी अहिल्या गाठाळ तहसीलदार मंजुषा लटपटे यांना तीन दिवसाआड बाजार भरवण्याची विनंती केली आहे. त्याला ही नागरिक जुमानत नसून दररोज बाजार भरत असल्याने नागरिक बाहेर पडत आहेत. वेळीच हे न रोखल्यास त्याचे परिणाम शहराला भोगावे लागणार आहेत.