Coronavirus Lockdown : ‘लॉकडाऊन’मध्ये दारू विक्री ‘जोमात’ अन् ‘ब्लॅक’नं देणारे 23 जण ‘कोमात’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  शहरात करोनाच्या पार्श्वभुमीवर संचारबंदी असताना विविध भागात छुप्या पद्धतीने मद्यविक्री करणाऱ्यावर पोलिसांनी जोरदार कारवाई केली आहे. गुन्हे शाखेच्या पथकांनी २३ जणांना अटक केली. तर, अमली पदार्थ विक्री प्रकरणी दोन गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी तबल पावणे चार कोटीचा गांजा व चरस जप्त केले आहे.

राज्यात कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी संचारबंदी जाहीर केली आहे. नागरिकांना घराबाहेर पडू नये असे आवाहन केले जात आहे. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.

मात्र या काळात अनेक ठिकाणी अवैध धंदे सुरु असल्याचे फोन नागरिक करत आहेत. त्यामुळे गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त अशोक मोराळे यांनी गुन्हे शाखेच्या सर्व पथकांना शहरात कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

गुन्हे शाखेच्या पथकांनी विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत जाऊन मद्य विक्री करणाऱ्यांवर छापे टाकले. हडपसर, बिबवेवाडी, सिहगड रोड, कोंढवा, फरासखाना, मुंढवा, विमानतळ, सहकारनगर, लष्कर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैधपणे मद्यविक्री करणाऱ्यांवर कारवाई केली. २२ गुन्हे दाखल करून २३ जणांस अटक केली आहे. यामध्ये ४९ हजार रुपयांचे मद्य व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.

मद्याबरोबरच अमली पदार्थाची विक्री करणाऱ्यांवर गुन्हे शाखेकडून कारवाई करण्यात आली आहे. एनडीपीएस कायद्यानुसार दोन गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये सात हजार रुपयांचा गांजा व तीन लाख ६० हजार रुपयांचे चरस जप्त करण्यात आला आहे. या पुढे देखील ही कारवाई सुरू राहणार आहे.