‘त्या’ पोलिस कर्मचार्‍यांना कार्यालयीन काम करण्याच्या ‘सूचना’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा सर्वाधिक धोका वयस्कर आणि काही आजार असलेल्या व्यक्तींना आहे. त्यामुळे आता पुणे पोलिसांनी निवृत्ती जवळ आलेले तसेच काही आजार असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कार्यालयीन काम देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी या सूचना दिल्या आहेत.

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून आरोग्य विभाग, पोलिस, जिल्हा प्रशासन काम करत आहे. पोलिस दल 24 तास काम करत आहे. नागरिकांना बाहेर पडू नये म्हणून आवाहन केले आहे. तरीही नागरिक बाहेर पडत आहेत. त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची वेळ पोलिसांवर आली आहे. बंदोबस्त करताना काही पोलिसांना देखील कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे पोलिस दलात खबरदारी घेतली जात आहे. मास्क, हॅडग्लोव्हज, फेसशील्ड, सॅनिटायझरचा वापर करण्यास सांगितले जात आहे. तसेच, घरी परतल्यानंतर अंघोळ करणे, वापरलेले कपडे डेटॉलच्या पाण्यात भिजत ठेऊन दुसऱ्या दिवशी धुणे, सुरक्षित अंतर ठेवणे अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

कोरोनाचा धोका सर्वाधिक वयस्कर नागरिक व आजारी व्यक्तींना आहे. पोलिस दलातील आजारी व्यक्ती, निवृत्ती जवळ आलेले पोलिस यांना फक्त कार्यालयीन काम द्यावे, असे सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, कोणत्याही पोलिसाला सर्दी, खोकला, श्वसनाचा त्रास जाणवत असल्यास महापालिकेच्या फ्लू सेंटरमध्ये जाऊन तपासणी करावी. तसेच, करोनाची चाचणी करून घ्यावी. ती चाचणी पॉझिटीव्ह आल्यास तत्काळ विलगीकरून घ्यावे, तसेच, पोलिस वसाहतीमध्ये देखील अशाच पद्धतीने काळजी घ्यावी, तसेच, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्य विषयक दक्षतेसाठी चौकशी करून त्यांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचनाही सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिल्या आहेत.