महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्यासाठी शिजवलेले कारस्थान ‘कच्चे’ राहिले !

पोलीसनामा ऑनलाइन – लॉकडाउनमध्ये वाधवान’ कुटूंबिय महाबळेश्वर गेले होते. हे प्रकरण गंभीर आहे. पण या प्रकरणामुळे राज्य सरकारने आतापर्यंत केलेल्या सर्व महत्त्वाच्या कामावर पाणी फेरावे असे काही नाही. त्यामुळे विविध पृश्न विचारुन नुसते शब्दांचे बुडबुडे का उडवता? असा सवाल सामना संपादकीयच्या माध्यमातून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्यासाठी हे कारस्थान नक्कीच झाले आहे. पण शिजवलेले कारस्थान कच्चे राहिले आहे.

वाधवानमुळे पोलीस अधिकारी अमिताभ गुप्ता यांना महाराष्ट्र सरकारने सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. महाराष्ट्र कोरोना’ युद्धात तन, मन, धन अर्पून उतरला आहे. राज्यातील जनता या युद्धात सामील आहे. विरोधकांनी पेटवलेल्या वेगळ्या चुलीवर वाधवान’प्रकरणाचे कारस्थान शिजले नाही. त्यांचे वैफल्य समजून घेऊन सरकारने पुढच्या कामास लागावे हेच उत्तम असा सल्ला सामनामधून देण्यात आला आहे.

दुधात मिठाचा खडा पडावा तसे हे प्रकरण समोर आले. वाधवान यांना त्याच्या 23 कुटुंबियांना खंडाळा ते महाबळेश्वर असा प्रवास करण्याची परवानगी अमिताभ गुप्ता नामक गृह खात्याच्या प्रधान सचिवाने दिली. वाधवान यांनी हे पत्र घेऊन लॉक डाऊन’ काळात प्रवास केला. हे कायद्याशी बेईमानी करणारे कृत्य आहे. वाधवान हे देशातील अतिश्रीमंतांपैकी एक मानले जातात. येस’ बँक घोटाळ्यात त्यांचे नाव आहे आणि ईडी’ वगैरे मंडळींना ते चौकशीसाठी हवे असताना हे महाशय खंडाळ्यातील एका खासगी जागेत लपून बसले आणि तेथून बड्या पोलीस अधिकाऱयाचे पत्र घेऊन बाहेर पडले. महाबळेश्वरमध्ये असलेल्या स्वत:च्या अलिशान फार्म हाऊसमध्ये पोहोचले. इथपर्यंत सगळे ठीक, पण हा प्रवास त्यांनी मंत्रालयातील बडया पोलीस अधिकाऱयाच्या शिफारसीवरून केला आणि त्याबद्दल विरोधी पक्षाने वाद निर्माण केला आहे. वाधवान’ प्रकरण हे गंभीर आहेच, पण या प्रकरणामुळे राज्य सरकारने आतापर्यंत केलेल्या सर्व महत्त्वाच्या कामावर पाणी फेरावे असे काही नाही असे नमूद करण्यात आले आहे.