केंद्र सरकारने आखली योजना ! 30 % हजेरीसोबत शाळा सुरु होण्याची शक्यता

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनाचा कहर सुरु असतानाही आता केंद्र सरकार झोन प्रमाणे शाळा पुन्हा सुरु कऱण्याचा विचार करत आहे. ग्रीन आणि ऑरेंज झोन जिल्ह्यांमध्ये सर्वप्रथम शाळा सुरु करण्याची योजना केंद्र सरकार आखत आहे. सातवी इयत्तेच्या पुढील विद्यार्थ्यांनाच बोलावले जाऊ शकते. प्राथमिक वर्गाच्या (पहिली ते सातवी) विद्यार्थ्यांना जोपर्यंत शाळा पूर्णपणे सुरु होत नाहीत तोपर्यंत घरीच थांबण्यास सांगितले जाणार असल्याची शक्यता आहे.

कोरोनात लहान मुलांकडून सुरक्षेचे कडक नियम पाळण्याची अपेक्षा केली जाऊ शकत नाही. यासाठी सुरक्षेच्या हेतूने त्यांना घरातच थांबवण्यास सांगितलं जाणार आहे. घरातूनच त्यांना अभ्यास करण्यास सांगितले जाणार आहे. शाळा पुन्हा सुरु करण्यासंबंधी अधिकृत सूचना पुढील आठवड्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्व संबंधित मंत्रालयांचं एकमत झाल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. शाळा सुरु होण्यासाठी तारीख ठरवण्यात आली असून जुलै महिन्यात विद्यार्थ्यांना दिलासा मिळू शकतो. 30 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करत शाळा सुरु कऱण्यात येतील. शाळा दोन शिफ्टमध्ये सुरु होण्याची शक्यता आहे. शाळा सुरु झाल्यानंतर मोठे कार्यक्रम घेण्यावर बंधने राहणार आहेत. सोशल डिस्टन्स नियमांंचे पालन व्हावे यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. काही दिवसांपूर्वी मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी सुरक्षेचे नियम पाळत शाळा आणि कॉलेज पुन्हा सुरु करण्याचे संकेत दिले होते.