Lockdown : … तर सरकारला ‘लॉकडाऊन’ वाढवण्याबाबत भूमिका घ्यावीच लागेल, शरद पवारांनी सांगितलं

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार लॉकडाऊनच्या काळात राज्यातील जनतेशी संवाद साधून जनतेला धीर देत आहेत. तसेच कोरोनामुळे ओढावणाऱ्या संकटाची जाणीव करून देत आहे. संकटाची जाणीव करून देत असताना संयम बाळगण्याचेही आवाहन करत आहेत. आज शरद पवार यांनी जनतेशी संवाद साधताना वेगवेगळ्या मुद्यांवर भाष्य करताना लॉकडाऊनला मुदतवाढ देण्याच्या शक्यतेविषयी संकेत दिले.

फेसबुक लाईव्हवरून संवाद साधताना शरद पवार यांनी राजधानी दिल्लीतील निझामुद्दीन येथील मरकजमध्ये झालेल्या कार्यक्रमाविषयी नाराजी व्यक्त केली. मरकजचा कार्यक्रम टाळायला हवा होता. त्यामुळे देशात परिणाम होतील. महाराष्ट्रात तरी असं काही होऊ देऊ नका, मुस्लिम नागरिकांनी घरातच नमाज आदा करावी, असे आवाहन शरद पवार यांनी केले आहे.

देशात 90 टक्के नागरिक लॉकडाऊनला प्रतिसाद देत आहेत. तर 10 टक्के लोक अद्यापही नियम पायदळी तुडवत आहेत. त्यामुळे कोरोनाला आवर घालण्याचा प्रयत्न सुरु असताना संयम पाळण्याची गरज आहे. दोन आठवडे धीर धरायला पाहिजे. 14 एप्रिलला आंबेडकर जयंती आहे. दरवर्षी आपण दोन महिने हा जयंती सोहळा साजरा करत असतो. पण यावेळी तशी परिस्थिती नाही. त्यामुळे जयंती सोहळा पुढे ढकलण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

राज्य सरकारनं रोगावर आवर घालण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. आरोग्य यंत्रणेला लोकांनी सहकार्य करावे. तसेच पोलीस कर्मचारी धोका पत्कारून काम करत आहेत. पण लोक लॉकडाऊन पाळत नाहीत. त्यांची किंमत सर्वांना द्यावी लागेल. लॉकडाऊन न पाळणाऱ्यांविरोधात पोलिसांनी भूमिका घ्यावी लागेत आहे. सध्या दोन आठवड्यांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. मात्र, लोकांनी काळजी घ्यावी लागेल, काळजी घेतली नाही तर संसर्ग वाढत जाईल. अस झाले तर लॉकडाऊनचा कालावाधी वाढवण्याची भूमिका केंद्र आणि राज्य सरकारला घ्यावी लागेल. त्यामुळे कृपा करून ही वेळ येऊ नये म्हणून नियमांचे पालन करा, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.