दिवे पेटवण्यावरून शिवसेनेकडून पुन्हा पंतप्रधान मोदींवर टीका !

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या लढ्यासाठी दिवे लावण्याच्या कार्यक्रमावरून शिवसेनेने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. पंतप्रधानांनी दिवे लावण्याचे आवाहन केलेले असताना लोकांनी गर्दी केली. त्याचबरोबर फटाकेही फोडले. यावरून शिवसेनेने पंतप्रधानांना टोला लगावला आहे. त्यामुळे कोरोनाचा मुकाबला करीत असताना भाजपला शिवसेनेच्या टीकेला वारंवार सामोरे जावे लागत आहे.लगावला आहे.सामनाच्या अग्रलेखात शिवसेनेने दिवे लावण्याऐवजी लोकांनी केलेल्या गर्दीवरून पंतप्रधान मोदींना दोष दिला आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनानंतरही अखेर जे व्हायचे तेच झाले. कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी त्यांनी ज्या उपाययोजना सांगितल्या होत्या, त्यामुळे कोरोनासंदर्भात जनजागृती होते का असा सवाल उपस्थित केला आहे . सर्वप्रथम पंतप्रधान मोदी यांनी घराच्या गॅलरीत येऊन टाळ्या आणि थाळ्या वाजवायला सांगितल्या होत्या. त्यानंतर रविवारी रात्री नऊ वाजता नऊ मिनिटांसाठी घरातील सर्व दिवे बंद करून पणत्या, मेणबत्त्या लावाव्यात असे आवाहन केले.

पंतप्रधानांच्या भावना लोकांपर्यंत नीट पोहोचत नाहीत असे दिसते. अन्यथा रविवारी देशात अनेक ठिकाणी जे दिव्य प्रताप झाले ते घडले नसते. लोकांनी काळोख केला हे खरे, पण त्या काळोखात लोक पुन्हा झुंड’ करून रस्त्यांवर उतरले. हातात मेणबत्या, टॉर्च, मोबाईलच्या बॅटर्‍या नाचवत थयथया नाचू लागले. त्यामुळे कोरोनाशी लढताना ज्या ‘सोशल डिस्टन्सिंग’ची सगळयात जास्त गरज आहे त्याची ऐशीची तैशी झाली. पंतप्रधानांनाही हा तमाशा नक्कीच अपेक्षित नसावा, असे शिवसेनेने म्हटले आहे. कोरोनामुळे आज हजारो रुग्ण मृत्यूशी झुंज देत आहेत. काहींनी त्यांचे प्राणही गमावले आहेत. अशा वेळी परिस्थितीचे गांभीर्य न ओळखता लोक रस्त्यांवर घोळक्याने फिरतात, घोषणा देतात, फटाके फोडतात, आतिषबाजी करतात हा सगळाच प्रकार हास्यास्पद आहे.

लोक मशाली आणि दिवट्या घेऊन रस्त्यांवर उतरले. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. पोलीस सकाळपासून रस्त्यावर येणार्‍या लोकांना थांबवत होते. त्यांच्याशी वाईटपणा घेत होते. पण रविवारी रात्री नऊ वाजता पंतप्रधान मोदी यांच्याच आदेशाने लोक रस्त्यावर उतरले. त्यामुळे कायदा व नियम मोडून पडले. याचा सरळ अर्थ आम्ही असा काढला की, पंतप्रधानांना जे सांगायचे आहे त्याचा विपरीत अर्थ काढून लोक आपापली सोय पाहत आहेत. दुसरे असे की, पंतप्रधानांचा लोकांशी नीट संवाद होत नाही. शेवटचा अर्थ असा की, जे घडते आहे तसे ॠउत्सवी’ वातावरण पंतप्रधानांनाच हवे आहे, अशी टीका सेनेने केली आहे.