संजय राऊत यांचं ठाकरे सरकारच्या स्थिरतेवर मोठं वक्तव्य

पोलिसनामा ऑनलाईन – शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत सोमवारी संध्याकाळी मातोश्रीवर बैठक पार पडली आहे. त्यामुळे कुणी सरकारच्या स्थिरतेबाबत बातम्यांचा धुरळा उडवत असेल तर ती निव्वळ पोटदुखी समजावी असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

कोरोनाच्या महामाारीचा सामना करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार अयशस्वी ठरल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. याचदरम्यान राज्यातील अनेक नेत्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शनिवारी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर सोमवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपा नेते नारायण राणेदेखील भेटीला पोहोचले होते. संजय राऊत आणि शरद पवार यांनी ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले. तर नारायण राणे यांनी मात्र सरकार कोरोना संकट रोखण्यात अपयशी ठरले असून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.

राज्यपालांच्या भेटीसाठी नेत्यांची रांग लागल्याने वेगवेगळे तर्क-वितर्क लढवले जात आहेत. या पार्श्वभुमीवर संजय राऊत यांनी ट्विट करुन , शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल संध्याकाळी मातोश्रीवर भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये दीड तास चर्चा झाली. कोणी सरकारच्या स्थिरतेबाबत बातम्यांचा धुरळा उडवत असतील तर ती निव्वळ पोटदुखी समजावी. सरकार मजबूत आहे. चिंता नसावी असे नमूद केले आहे. राऊत यांनी याआधी केंद्र सरकार आणि भाजपा राज्य सरकार बरखास्त करुन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू व्हावी अशी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. पण त्यांना यश मिळणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.