…पण उध्दव ठाकरेंना 11 कोटी जनतेचा आशिर्वाद

पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रातील साधू हत्येचे मारेकरी फासावर जातील. मात्र इतर राज्यांत भूकबळी व त्यातून जे झुंडबळी जात आहेत त्यावर काय ते बोला! अशावेळी तुमचे घसे बसतात व डोळे तिरळे होतात. ही पत्रकारिता समाजविरोधी आहे अशी टीका शिवसेनेने सामना संपादकीयमधून केली आहे.
राज्यातील वातावरण बिघडविणाऱया टोळधाडी कोणत्याही थराला जातील हे आता स्पष्ट झाले आहे. या टोळधाडींना ज्या कुणाचा आशीर्वाद असेल तो असू द्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 11 कोटी जनतेचा आशीर्वाद आहे. हे आशीर्वाद म्हणजे तुमच्या रेकण्यातून निर्माण झालेली फेक न्यूज नाही. फेक न्यूजवाल्यांवरील हल्लेही फेकच ठरतात. सरकारला बदनाम करण्यासाठी सुरू झालेले हे फेकतंत्र त्यांच्यावरच उलटेल असे शिवसेनेने म्हटले आहे.

मॉब लिंचींग म्हणजे झुंडबळी कोठे होतील याचा काही भरवसा राहिलेला नाही. उत्तर प्रदेशातील घटना महाराष्ट्रातील डहाणूपेक्षाही हृदयद्रावक आहे. अन्नासाठी घराबाहेर पडलेल्या गरीबाला जमावाने ठेचून ठेचून मारले आहे. महाराष्ट्रात दोन साधूंसह तिघांची हत्या जमावाच्या झुंडगिरीने केली. त्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी महाराज यांनी चिंता व्यक्त केली होती. ती योग्यच असून समाजात बेरोजगारी आणि भविष्यातील चिंतेने भावनांचा उद्रेक होत आहे. त्यातून हिंसा वाढते आहे. भविष्याच्या पोटात काय दडले आहे त्याचे हे विदारक चित्र आहे. पालघरमधील साधूंची हत्या हा माणुसकीला कलंक आहे. त्याचे राजकारण कोणी करू नये, पण भक्तमंडळी सध्या रिकामटेकडी बसली आहेत व कोरोना युद्धाच्या धुरावर स्वत:च्या भाकऱया शेकवीत आहेत. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशसारख्या राज्यांत लॉकडाऊनमुळे भूकबळी व त्यातून झुंडबळी सुरू झाले. यावर एखादे चॅनल त्याचे ते डिबेट की काय ते का करत नाही व भक्त मंडळही तोंडाचे लॉकडाऊनकरून गप्प का बसले आहेत? अशी विचारणा शिवसेनेने केली आहे.