चीनविषयी जगात द्वेष वाढणे ही भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सुवर्णसंधी : नितीन गडकरी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोनामुळे जगभरात चीनविरोधात द्वेष वाढत असून भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सुवर्णसंधी असल्याचे मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून परदेशातील भारतीय विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

जगभरात कोरोनामुळे चीन विरोधात द्वेष वाढत आहे. हे एका संधीत रुपांतरित करणे भारताला शक्य आहे का?, अशी विचारणा विद्यार्थ्यांनी त्यांना केली. यावेळी नितीन गडकरी यांनी जपानने चीनमधून बाहेर पडणार्‍या उद्योगांसाठी आर्थिक पॅकेज जाहीर केला जात असल्याचा उल्लेख केला. भारतात तशी संधी किंवा परिस्थिती निर्माण करुन दिली पाहिजे. आपण त्यांना मंजुरी आणि परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी जे काही गरज लागेल ते सर्व देऊ, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.

गडकरी यांना विद्यार्थ्यांनी जर चीनने जाणुनबुजून या व्हायरसचा फैलाव होत असल्याची माहिती लपवली असल्याचे समोर आले, तर भारत काही कारवाई करणार का ? असे विचारले असता, हा अत्यंत संवेदनशील विषय आहे. परराष्ट्र मंत्रालय आणि पंतप्रधान यांच्याशी संबंधित हा विषय असल्याने आपण त्यावर बोलणे योग्य ठरणार नाही. सर्व सरकारी कार्यालये, खासकरुन अर्थमंत्रालय आरबीआय कोरोनाविरोधातील आर्थिक लढाईशी लढत असून वेगवेगळ्या योजना जाहीर करत आहेत. असेही त्यांनी नमूद केले.