Coronavirus Lockdown : पावसाळापूर्व कामांना मुहूर्त कधी….

पुणे : प्रतिनिधी – नेमिची येतो पावसाळा…. या वर्षीसुद्धा पावसाळा तोंडावर आला आहे. कोरोना व्हायरसचे संकट भयावह आहे. त्यामुळे मागिल दीड महिन्यापासून देश लॉकडाऊन असल्याने सर्व व्यवहार ठप्प आहेत. मात्र महापालिकेची कामे सुरू आहे. त्यामुळे महापालिकेने पावसाळापूर्व कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी सामान्य नागरिकांकडून होत आहे.

कोरोनाचा व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी जगभरातून प्रयत्न सुरू आहेत, त्यासाठी 24 तास यंत्रणा काम करीत आहे. पालिका प्रशासनाने किमान येत्या पावसाळ्यात कोठे पाणी साचणार नाही, नाले तुंबणार नाहीत, मलवाहिनी ओव्हरफ्लो होणार नाही, पावसाळी वाहिन्यातून कचऱ्यामुळे पाणी थोपणार नाही, यासाठी पावसाळापूर्व कामे मार्गी लावणे, ही अत्यंत महत्त्वाची गरज आहे. शहर उपनगर आणि लगतच्या गावातही पाणी साचणार नाही, यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

मलवाहिनी आणि पावसाळी वाहिनी स्वच्छ न केल्यामुळे दरवर्षी शहर, उपनगरामध्ये पाणी तुंबते, नागरिकांच्या घरात शिरते, पूरस्थिती निर्माण होते. ही बाब दरवर्षी होते, ही बाब सामान्य नागरिकांना समजत आहे. मात्र, ती महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना का समजत नाही, असा खडा सवाल सामान्यजनांकडून उपस्थित केला जात आहे. आता रस्त्यावर आणि गल्लीबोळातही वाहनांना बंदी आहे, त्यामुळे कोणतीही कामे करण्यासाठी अडथळा होणार नाही. मलवाहिनी आणि पावसाळी वाहिन्या स्वच्छ करण्यासाठी तातडीने उपाययोजना हाती घेणे महत्त्वाचे आहे.

मागिल महिन्यापासून अवकाळी पावसाने सुरूवात केली आहे. पुणे शहरात मागिल महिन्यात दोन-तीन पाऊस झाले. त्यावेळी काही ठिकाणी पाणी साचले, तर काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या होत्या. त्यामुळे महापालिका प्रशासनाने आता जुन्या झाडांच्या फांद्या छाटणेसुद्धा गरजेचे आहे. पावसाळ्यामध्ये झाडांच्या फांद्या तुटणे झाडे उन्मळून पडण्याचे प्रकार होऊन अपघात होतात. मुख्य रस्त्याबरोबर अंतर्गत रस्त्याची पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करावी. अनेक ठिकाणी रस्ते खोदून टेवले आहेत, त्याचे डांबरीकरणही तातडीने मार्गी लावावे. तसेच पदपथ उखडले आहेत, त्याची दुरुस्ती करणे नागरिकांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. पावसाचे पाणी साचून, तेथे डास-मच्छर होऊन डेंग्यू, मलेरियासारखे आजार पसरण्याची भीती असते.

हडपसरमधील शिवसेनेचे कार्यकर्ते महेंद्र बनकर म्हणाले की, कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे नागरिकांच्या मनामध्ये प्रचंड भीतीचे सावट आहे. त्यामुळे महापालिकेच्या घनकचरा विभागाने कालवा, तसेच सार्वजनिक ठिकाणे, शाळा-महाविद्यालयांची मैदाने, बसथांबे या ठिकाणचा कचरा स्वच्छ करून औषध फवारणी करणेही नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. आपण आपला परिसर स्वच्छ ठेवू… ही संकल्पना फक्त कागदावर नको, तर प्रत्यक्षात उतरविणे गरजेचे आहे. आता शहरासह उपनगरातील रस्त्यावर सन्नाटा आहे, त्यामुळे पालिका प्रशासनाने रस्ते दुरुस्तीसह स्वच्छता अभियानही राबविणे महत्त्वाचे आहे. निरोगी आरोग्यासाठी शहर स्वच्छ असणेसुद्धा महत्त्वाचे आहे.