Lockdown : ‘या’ राज्यात 16 मे पर्यंत लॉकडाऊन वाढण्याची शक्यता, डॉक्टर समितीनं दिले ‘संकेत’

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –  देशातील कोरोना संसर्गित रुग्णांमध्ये गेल्या २४ तासांत १ हजार ४२९ इतकी वाढ झाली आहे. आतापर्यंत २४ हजार ५०६ जणांना कोरोना संसर्ग झालायं. तर ७७५ लोकांचा मृत्यू कोरोना संसर्गाने झाला आहे. राजधानी दिल्लीत कोरोना संसर्गित रुग्णांचा आकडा २ हजार ५०० पर्यंत पोहचला असल्याने कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी ३ मे नंतर देखील लॉकडाऊन वाढवण्याचा विचार सुरु आहे.

दिल्ली सरकारने कोरोना संसर्गा विरुद्ध लढण्यासाठी टॉप डॉक्टरांचे एक पॅनल बनविले आहे त्यांनी १६ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचे संकेत दिले. आताची परिस्थिती पाहता लॉकडाऊन चा कालावधी वाढवला पाहिजे असं मत सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मांडले. याबाबत टाइम्स ऑफ इंडियाला बोलताना दिल्ली सरकारच्या डॉक्टर पॅनलचे प्रमुख एस के सरीन यांनी सांगितले की, लॉकडाऊन चा कालावधी १६ मे पर्यंत वाढवला पाहिजे. यामुळे कोरोना संसर्गाचा ग्राफ खाली उतरण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

दिल्लीत लॉकडाऊन १६ मे पर्यंत का गरजेचं आहे? असं डॉक्टर एस के सरीन यांना विचारलं असता. त्यावेळी ते म्हणाले की, दिल्लीत कोरोना संसर्गाचा पहिला रुग्ण ३ मार्च रोजी आढळला होता. कोरोना महामारीला रोखण्यासाठी चीनच्या रेकॉर्डवर नजर टाकल्यास त्यांचा संक्रमण आणि मृत्यू दर खाली येण्यासाठी कमीत कमी १० आठवड्याचा कालावधी लागला. तसेच दिल्लीमध्ये घडू शकते.

दिल्ली आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, दिल्लीत एका दिवसात १३६ कोरोना संसर्गित रुग्ण आढळल्याने हा आकडा २ हजार ५१४ झाला आहे. तर दिवसात ३ जणांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत दिल्लीत मृतांचा आकडा ५३ इतका झाला आहे.

दरम्यान, गृहमंत्रालयने शुक्रवारी रात्री आदेश काढून देशातील सर्व दुकाने काही अटींवर उघडण्याची परवानगी दिली आहे. आजपासून हा आदेश लागू होणार आहे. महापालिका आणि नगरपालिका हद्दीतील निवासी भाग आणि परिसरात दुकान उघडी ठवण्याची परवानगी देण्यात आलीयं. तर कोरोना संसर्गाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असणाऱ्या म्हणजेच हॉटस्पॉट असलेल्या आणि कॅन्टोनमेंटच्या ठिकाणी मात्र दुकान उघडी ठेवता येणार नाही. याव्यतिरिक्त मद्य विक्रीची दुकान तसंच मॉल्स सुरु करण्याला अद्याप मात्र परवानगी देण्यात आली नाही. गृह मंत्रालयनं दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या शॉप्स अँड एस्टॅबलिशमेंट कायद्याअंतर्गत येणाऱ्या दुकानांनाच सूट देण्यात आली आहे. मद्यविक्रीची दुकान ही एक्ससाइज कायद्याअंतर्गत येतात. त्यामुळे ही दुकानं बंदच राहणार आहे.