Coronavirus : ‘कोरोना’चा दुसरा सर्वोच्च टप्पा येणं अजून बाकी, WHO चा इशारा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – जगभरात हैदोस घालणार्‍या कोरोना व्हायरसचा दुसरा टप्पा सुरु होणे अजून बाकी आहे. त्यामुळे लॉकडाउन हटवण्याचा निर्णय अनेक देशाला घातक ठरू शकतो, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. लॉकडाउन हटवण्यात घाई केली तर कोरोनाचा दुसरा सर्वोच्च टप्पा येण्याची शक्यता जास्त आहे. यासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेचे आपत्कालीन संचालक डॉक्टर माइक रायन यांनी माहिती दिली आहे.

काही देशांमध्ये कोरोनाची प्रकरणे कमी होत असली तर मध्य आणि दक्षिण अमेरिका, दक्षिण आशिया आणि आफ्रिका येथे ही संख्या वाढत आहे. सध्या जग कोरोनाच्या पहिल्या लाटेत असून कोणत्याही क्षणी संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असल्याने सरकारने ठाम राहणे गरजेचे आहे. हॉपकिन्स युनिव्हर्सिटीने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात 50 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. ज्या देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे त्यांना इशारा देताना माइक रायन यांनी कोरोना टप्प्याटप्प्याने येत असल्याचा इशारा दिला आहे. माइक रायन यांनी युरोप आणि नॉर्थ अमेरिका जिथे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत आणि सर्वसामान्य जीवन सुरळीत होत आहे त्यांनाही लोकांच्या सुरक्षेसाठी सर्व काळजी घेण्यास सांगितलं आहे.

जेणेकरुन करोनाची दुसरी लाट टाळता येईल असेही ते म्हणाले आहेत. कोरोना कोणत्याही क्षणी पुन्हा एकदा वाढू शकतो. कोरोनाची प्रकरणे कमी झाली याचा अर्थ त्याचा प्रभाव आता कमी होत जाईल आणि आपल्याकडे दुसरी लाट येण्याआधी तयारीसाठी खूप वेळ आहे असा विचार करणे चुकीचे ठरणार आहे. असे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे.