दिलासादायक ! ‘कोरोना’ प्राणघातक नव्हे तर होतोय कमकुवत, तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितलं

रोम : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतले आहे. कोरोना विषाणू स्वत:मध्ये अनेक बदल करत असल्याने अद्याप यावर कोणतीही लस उपलब्ध होऊ शकली नाही. कोरोनाची आतापर्यंत नवनवीन रुपं समोर आली आहेत. आताही कोरोना विषाणूने आपल्यात बदल केले आहेत मात्र आता हा विषाणू अधिक प्राणघातक झाला नाही तर हा विषाणू कमजोर पडू लागला आहे, असा दावा इटलीतील एका तज्ज्ञ डॉक्टराने केला आहे.

कोरोना व्हायरसच आपली क्षमता गमावत आहे, तो कमजोर आणि कमी प्राणघातक होतो आहे, असं इटलीतील डॉ. अलबर्टो झॅन्गिलो यांनी सांगितले. डॉ. अल्बर्टो हे कोरोनाचा सर्वात जास्त फटका बसलेल्या लोम्बार्डीच्या उत्तरेला असलेल्या मिलानमधील सॅन रापाईल रुग्णालयाचे प्रमुख आहेत. एका वृत्तानुसार, इटलीत क्लिनिकली हा व्हायरस अस्तित्वात नाही, असा दावाही डॉ. अल्बर्टो यांनी केला आहे.

गेल्या 10 दिवसात जे स्वॅब टेस्ट करण्यात आलेत. त्यावरून व्हायरल लोडचं प्रमाण खूप कमी असल्याचे दिसून आलं आहे. गेल्या एक ते दोन महिन्यांपूर्वी हा व्हायरल लोड भरपूर होता, अशी माहिती त्यांनी एका टेलीव्हिजनशी बोलताना दिली.

कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांमध्ये इटलीचा समावेश आहे. जगभरात कोरोना व्हायरसची सर्वाधिक प्रकरणं असलेल्या देशांच्या यादीत इटली सहाव्या क्रमांकावर आहेत. तर मृतांच्या बाबतीत तिसरा देश आहे. देशात 21 फेब्रुवारी रोजी कोरोनाचा उद्रेक झाला. आतापर्यंत 2 लाख 33 हजार 019 कोरोनाचे रुग्ण या देशात आहेत. तर 33 हजार 415 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

मे महिन्यामध्ये इटलीतील कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होऊ लागला आहे. कोरोनाची नवीन प्रकरणं आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण देखील कमी झालं आहे. यानंतर युरोपमध्ये सर्वात कठोर असा लॉकडाऊन लागू केलेल्या देशांपैकी एक असलेल्या इटलीत लॉकडाऊन हळूहळू शिथील केला जात आहे.