भारतीय कंपनीनं बनवला ‘कोरोना’विरूध्द लढाईत उपयुक्त ठरणारा ‘कार्डबोर्ड’चा बेड, किंमत फक्त 900 रूपये

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   जगभरात कोरोना संसर्गाचे २५ लाखांच्या वर रुग्ण झाले असून, कोरोनाने १८० हुन अधिक देशांना आपला विळखा घातला आहे. काही देशात कोरोना संसर्गाचा प्रसार इतक्या मोठ्या प्रमाणात झाला की, तिथे जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवू लागला. तसेच आरोग्य सेवेवर ताण पडताना दिसत आहे. अनेक ठिकाणी पीपीई किट्स (पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्वीपमेंट), ९५ मास्क, व्हेंटीलेटर्स आणि बेड्सचा तुटवडा जाणवू लागला आहे. अमेरिका, स्पेन, इटली सारख्या देशांमध्ये तर कोरोना संसर्गाने हाहाकार माजवला आहे. त्या तुलनेत भारताची स्थिती अद्याप बरीच चांगली आहे. मात्र जगातील स्थितीचा अंदाज घेता भारतातील एका कंपनीने स्वतः बेडची निर्मिती केली आहे. गुजरात मध्ये वापी येथील आर्यन पेपर या कंपनीने फोल्ड होणार आणि पूर्ण पणे कार्डबोर्डपासून बनविलेल्या बेडची निर्मिती केलीय.

कार्डबोर्डपासून बनविल्यामुळे हा बेड एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जायला व तो तयार करायला अगदीच सोप्पं आहे. भविष्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव शहरी तसेच ग्रामीण भागात वाढल्यास बेडचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. तेव्हा या बेडचा वापर करणे शक्य होणार आहे. यात आश्चर्यकारक गोष्ट अशी की, या बेडचे वजन अवघे १० किलो आहे. मात्र असं असलं तरी या बेडवरती २०० किलोपर्यंत वजन ठेवता येऊ शकते असं कंपनीने म्हटलं आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये हा बेड वापरण्यात येण्याची शक्यता असल्याने या बेडवर विशेष प्रकारच्या रसायनांचे कोटींग करण्यात आलंय. त्यामुळे हा बेड सहज ओला होऊ शकणार नाही. म्हणजेच एखादा द्रव सांडल्यास किंवा बेडच्या संपर्कात आल्यास, बेडच्या रचनेवरती अंशतः देखील परिणाम होणार नाही.

या बेडचे वैशिष्ट्य असे की, हा बेड तयार करण्यासाठी कोणतीही हत्यारे लागत नाही. शाळेमध्ये एखाद्या प्रोजेक्टदरम्यान जसं खाच्यांमध्ये अडकवून एखादे मॉडेल तयार केले जाते त्याचप्रमाणे हा बेड उभारता येतो. अवघ्या काही मिनिटात कोणत्याही समजदार व्यक्तीला हा बेड तयार करता येईल इतके सोपे तंत्रज्ञान यामध्ये वापरण्यात आलंय. हा बेड पर्यावरण पूरक आहे. यामुळे वापर झाल्यावरती किंवा अती वापरामुळे खराब झल्यास हा कार्डबोर्डने बनविला असल्याने त्याचे विघटन होते आणि त्यामुळे घन कचऱ्याची निर्मिती होत नाही.

दरम्यान, या बेडची किंमत अवघे ९०० ते एका हजार रुपये आहे. तसेच बेडच्या डिलिव्हरीचे वेगळे शुल्क कंपनीकडून आकारले जाईल असं सांगण्यात येत आहे. सध्या या बेडची निर्यात गुजरात सरकार, मुंबई महानगरपालिका आणि भारतीय नौदलाला होत आहे.