चिंताजनक ! राज्यात सक्रिय रुग्णसंख्या 7 लाखांच्या उंबरठ्यावर, महिनाभरात तिपटीने वाढ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने परिस्थिती बिकट बनली आहे. गेल्या महिनाभरात त्यात तिपटीने वाढ झाली आहे. 21 मार्चला सक्रिय रुग्णसंख्या 2 लाख 10 हजार 120 एवढी होती. ती 23 एप्रिल रोजी 6 लाख 91 हजार 851 एवढी झाली आहे. सक्रिय रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे वैद्यकीय तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.

राज्यात दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत आहे. सक्रिय रुग्णसंख्येत महाराष्ट्र आघाडीवर असून, इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील सक्रिय रुग्णांचे प्रमाण 55 टक्के आहे. सध्या रोजची नोंद 60 हजारांच्या आसपास होत असून सक्रिय रुग्णसंख्येत दररोज 6 ते 10 हजारांनी भर पडत आहे. सक्रिय रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. याबाबत राज्य कोरोना कृती समितीचे डॉ. अविनाश सुपे म्हणाले की, राज्यात सक्रिय रुग्णांची दिवसेंदिवस वाढत आहे. ही संख्या नियंत्रणात यायला महिना लागेल. सध्या डबल म्युटंट स्ट्रेन असल्याने रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे लोकांनी काळजी घ्यावी. शिवाय लसीकरणही तेवढ्या संख्येने झाले नाही. त्यामुळे ही चिंतेची बाब आहे. दुसरीकडे मास्कचा वापर, स्वच्छता आणि सोशल डिस्टन्सिंग याविषयी सूचना करत असतानाही त्याचे काटेकोरपणे पालन होत नाही, त्यामुळे रुग्णसंख्या वाढत असल्याचे ते म्हणाले.