ठाकरे सरकारचा महत्वाचा निर्णय ! मास्कच्या किमतीत मोठी घट, जाणून घ्या नव्या किमती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या अनुषंगाने मास्क आणि सॅनिटायझरचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने नेमलेल्या समितीने अहवाल सादर केला आहे. त्यानुसार आता सर्वसामान्यांना परवडणाऱ्या किंमतीत मास्क उपलब्ध होणार असून असा निर्णय घेणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले आहे. तसेच समितीने दिलेल्या दरानुसार मास्कची विक्री करणे बंधनकारक असल्याची माहिती, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

यासंदर्भात बोलताना राजेश टोपे यांनी सांगितलं, ‘कोरोना महामारीच्या पूर्वी एन ९५ मास्क ४० रुपयांना मिळायचा. मार्च महिन्यात याची किंमत ४० रुपयांवरुन १७५ रुपये एवढी झाली. काही एन ९५ मास्क २५० रुपयांपर्यंत विक्री झाले. तिहेरी आणि दुहेरी पदर असलेले मास्क ८ ते १० रुपयांवरुन १६ रुपयांना विक्री करण्यात आले असून त्यांच्या किंमतीत १६० टक्केपेक्षा अधिक वाढल्याचे समितीच्या समोर आले. म्हणून समितीने कच्चा माल, उत्पादन किंमत, उत्पादक, वितरक यांचा नफा या सर्व बाबींचा अभ्यास करुन आता एन ९५ मास्क त्याच्या प्रकारानुसार १९ ते ५० रुपयांपर्यंत उपलब्ध होईल तर दुहेरी आणि तिहेरी पदरांचे मास्क अवघ्या तीन चार रुपयांत मिळतील.’

तसेच नागरिकांना कमी किंमतीत मास्क उपलब्ध झाल्यावर दिलासा मिळणार असून निकषानुसार त्याचे उत्पादन होईल आणि योग्य दरात त्याचा पुरवठा सुद्धा केला जाईल. रुग्णालयांचा रुग्णसेवा खर्च देखील यामुळे कमी होईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

दरम्यान, राज्य सरकारने नागरिकांना मास्क वापरणे बंधनकारक केला असून तो न वापरल्यास दंडात्मक कारवाई होत आहे. निर्धारित केलेल्या किंमतीत मास्क विक्री होण्याबाबत राज्यस्तरावर अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी लक्ष ठेवणार असून जिल्हास्तरावर अधिक किंमतीने मास्क विक्री झाल्यास तक्रारींवर जिल्हाधिकाऱ्यांना कार्यवाही करता येईल, असे स्पष्ट करतानाच कोरोनाचा संसर्ग हा नफा कमवण्यासाठी नाही, असा इशारा राजेश टोपे यांनी दिला.