नारायण राणेंचा ठाकरे सरकारवर घणाघात, म्हणाले – ‘कोरोना फैलाव रोखण्यात राज्य सरकार अपयशी, भोंगळ कारभारामुळे…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ठाकरे सरकारने 1 मेपर्यंत कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे. दरम्यान लॉकडाऊन आणि सरकारच्या कोरोनाकाळातील कारभारावर भाजपा नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी घणाघाती टीका केली आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. राज्यात दिवसाला 60 हजारांहून अधिक रुग्ण सापडत आहेत. हे पाप ठाकरे सरकारचे आहे. देशातील एकूण मृतांपैकी 41 टक्के रुग्ण हे महाराष्ट्रातील आहेत. राज्य सरकारच्या भोंगळ कारभारामुळे अनेकांचे मृत्यू झाल्याची टीका राणे यांनी केली.

मुंबईत शुक्रवारी (दि. 16) आयोजित पत्रकार परिषदेत राणे बोलत होते. ते म्हणाले की, राज्य सरकारने लॉकडाऊन लावून दोन दिवस झाले. पण त्याचा परिणाम दिसत नाही आहे. सर्व शहरांत बाजारपेठा सुरू आहे. लोकांनी गर्दी केली आहे. अनेक घरांत अन्न नाही अशी परिस्थिती आहे. अनेक ठिकाणी दुकाने बंद ठेवल्याने दुकानदारावर उपासमारीची वेळ आली आहे. सरकारने काही घटकांना पॅकेज दिले आहे. मात्र दीड हजार रुपयामध्ये पाच माणसांच कुटुंब कसं भागवायचं. पॅकेज जाहीर करण्याची तयारी सुरु असल्याचे सांगितले जात आहे. मात्र सरकार कुणाकुणाला पॅकेज देणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. सध्याच्या परिस्थितीत राज्याला लॉकडाऊन परवडणारा नाही, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधानमोदींना लिहिलेल्या पत्रावरही राणे यांनी टीका केली. हे सरकार दोन वेळच्या जेवणासाठीही केंद्र सरकारला पत्र लिहेल आणि जेवण पाठवा म्हणून सांगेल असे म्हणत राणेंनी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे.