Coronavirus : देशात महाराष्ट्र सर्वात जास्त ‘कोरोना’ च्या तपासण्या करणारं राज्य, इथं आहेत 108 COVID-19 ‘टेस्ट’ लॅब

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात 12 मार्चला कोविड-19 चा पहिला संक्रमित रूग्ण सापडला होता, तेव्हा मुंबई, पुणे आणि नागपुरमध्ये तीनच तपासणी करणार्‍या प्रयोगशाळा म्हणजेच लॅब होत्या. आता त्या 108 झाल्या आहेत. आतापर्यंत 9 लाख 43 हजार 485 तपासण्या झाल्या आहेत. यामुळे महाराष्ट्र देशात सर्वाधिक तपासण्या करणारे राज्य ठरले आहे.

कोविड-19 तपासणीमध्ये 1 लाख 73 हजार 227 म्हणजेच 18.30 टक्के संक्रमित आढळले आहेत. देशभरात खासगी व सरकारी मिळून एकुण 1047 लॅब आहेत. महाराष्ट्रात सरकारी 62 आणि खासगी 46 अशा एकुण 108 लॅब कार्यरत आहेत. यापैकी थेट कोविड-19 सखोल तपासणी करणार्‍या 77, ’ट्रू नेट’ तपासणी करणार्‍या 16 आणि ’सीबी नेट’ तपासणी करणार्‍या 15 लॅब आहेत.

एकुण सॅम्पलच्या तपासणींपैकी 7, 73,291 (81.70 टक्के) रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. याबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटले की, आम्ही जास्त तपासण्या करत आहोत, यासाठी संक्रमितांची संख्या जास्त आहे. आम्ही एक संक्रमित सापडला तर त्याच्या संपर्कात आलेल्या 10 लोकांची तपासणी करतो. यासाठी ही संख्या जास्त आहे. बरे होणार्‍यांची संख्यासुद्धा जास्त आहे.

10 मिनिटात उरकल्या गेल्या फाईल्स
आरोग्य शिक्षण विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी म्हटले की, राज्याच्या सर्व सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये कोविड-19 तपासणी लॅब कार्यरत आहेत. यासाठी कोणतीही फाइल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्य शिक्षण मंत्र्यांनी 10 मिनिटापेक्षा जास्त आपल्याकडे ठेवली नाही. आयसीएमआरने सुद्धा वेगाने सर्व परवानग्या दिल्या.

महाराष्ट्रात मंगळवारी कोरोना व्हायरसचे 4,878 नवे रूग्ण समोर आले, ज्यामुळे राज्यात संसर्गाची 1,74,761 प्रकरणे झाली आहेत. राज्याच्या आरोग्य विभागानुसार संसर्गामुळे 245 रूग्णांच्या मृत्यूसह राज्यात महामारीमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या वाढून 7,855 झाली आहे.

विभागानुसार, कोरोना व्हायरसचे 1,951 रूग्ण बरे झाल्यानंतर दिवसभरात त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. ज्यामुळे राज्यात बरे झालेल्या रूग्णांची संख्या 90,911 वर पोहचली आहे. महाराष्ट्रात आता उपचार सुरू असलेल्या रूग्णांची संख्या 75,995 आहे.