Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 11514 नवे पॉझिटिव्ह तर 316 जणांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच 5 ऑगस्टपासून राज्यातील लॉकडाऊन शिथिल करण्यात आला. लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राज्यात 11 हजार 514 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. गेले काही दिवस दहा हजारांच्या आसपास नवे कोरोनाचे रुग्ण आढळून येत होते. त्यात आज उच्चांकी वाढ झाली आहे. तर त्याचबरोबर बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याने दिलासा मिळाला आहे. पण राज्यात नव्या रुग्णांच प्रमाण मात्र कमी होताना दिसत नसल्याने कोरोनाचे संकट कधी कमी होणार हे कळायला मार्ग नाही. राज्यातील कोरोना बाधित रुग्णाची संख्या 4 लाख 79 हजार 779 एवढी झाली असून रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 19.28 टक्के इतके आहे.

आज दिवसभरात 10854 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 3 लाख 16 हजार 375 रुग्ण बरे झाले आहेत. या रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 65.94 टक्के इतके झाले आहे. दिवसभरातल्या मृत्यूंचा आकडाही गेल्या काही दिवसांपासून वाढत आहे. राज्यात आज 315 रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे 16 हजार 792 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण 3.50 टक्के एवढे आहे.

राज्यामध्ये 1 लाख 46 हजार 305 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. त्यांच्यावर राज्यातील विविध रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. सध्या 9 लाख 76 हजार 332 लोक होम क्वारंटाईन आहेत, तर 37768 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आज नोंदवलेल्या 316 मृत्यूंपैकी गेल्या 48 तासामधील 246 आहेत. तर 44 गेल्या आठवड्याभरातले आहेत. उरलेले 26 त्यापूर्वी झालेले मृत्यू आहेत. अनलॉक नंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत तिपटीने वाढ झाली. मुंबईपेक्षा पुण्यात रुग्णवाढीचा वेग प्रचंड वाढला आहे. आता सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत.