Coronavirus Lockdown : राज्य सरकारकडून मोठा दिलासा ! 70 हजार बेघरांना ‘निवारा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात कोरोनाचे २१५ संसर्गित रुग्ण झाले असून, राज्यात कोरोनाचा प्रभाव वाढत आहे. देशात २१ दिवस लॉक डाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद असल्यामुळे, हजारो बेघर लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्या निवासाचा आणि उदर्निवाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने परराज्यातील हजारो मजूर त्यांच्या गावी चालत जायला निघाले आहे. यासाठी सरकारने पुढे येत बेघर लोकांना मोठा दिलासा दिला आहे. त्यासाठी राज्यभरात २६२ मदत केंद्रे उभारली आहे. तर ७० हजारांहून अधिक स्थलांतरित कामगार आणि बेघर लोकांना निवाऱ्याची सोय करण्यात आली आहे.

राज्यामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. आतापर्यंत राज्यात २१५ रुग्ण संसर्गित असून, १० जणांचा मृत्यू झाला आहे. राज्य सरकार च्या वतीने राज्यात संचार बंदी लागू करण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न चालू आहे. अशातच राज्यातील कामगार, मजूर आणि बेघर लोकांना स्थलांतर करण्यापासून रोखले जात असून, सरकारने कठोर पावलं उचलत त्यांना मोठा दिलासा दिला आहे. राज्य सरकारच्या वतीने या बेघर लोकांसाठी २६२ मदत केंद्रे उभारली जात आहे. या माध्यमातून ७० हजार ३९९ लोकांसाठी निवारा केंद्राची योजना मंजूर करून त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था देखील केली जात आहे. अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विटर द्वारे दिली.