राज्यात पुन्हा Lockdown होणार का ? ठाकरे सरकारमधील या दिग्गज मंत्र्यानं केला खुलासा, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार का? याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असतानाच मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मोठा खुलासा केला आहे. राज्यात कोरोना फोफावत असला तरी संपूर्ण राज्यात लॉकडाऊन जाहीर केले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच मुंबईतही गेल्या 2 दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. वाढती संख्या लक्षात घेता सामान्य नागरिकांसाठी सुरू असलेल्या लोकल ट्रेनमध्ये कपात केली जाणार आहे. तसेच क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांना घेवून वाहतूक करणाऱ्या बसगाड्यावरही निर्बंध घातले जाणार असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.

मंत्री वडेट्टीवार शुक्रवारी (दि.26) नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राज्यात गेल्या 2 दिवसांपासून कोरोना रुग्णांचा आलेख झपाट्याने वाढत आहे. देशात महाराष्ट्र आणि केरळमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे या याठिकाणी काही प्रमाणात कडक निर्बंध वाढवले जाणार आहेत. पण याचा अर्थ असा नाही की, याठिकाणी राज्यव्यापी लॉकडाऊन असेल, तथापि कोरोना प्रसाराचा वेग कमी करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. लोकल ट्रेनच्या सेवेत कपात करणे, बाजारपेठांच्या कडक निर्बंध लागू करणे, बसगाड्यातील गर्दी कमी करणे यावर काम करण्याची गरज आहे.

तसेच शहरातील मॉल्स बंद ठेवणे, मंगल कार्यालयांवर आणि इतर लग्न स्थळी गर्दी होणार नाही, याची दक्षता घेणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. तसेच विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेता येतील का ? याचा विचारही आम्ही करत आहोत. महाराष्ट्रात परीक्षा घेण्याची गरज आहे, यावर अनेकांची मत घेवून विचार केला जात आहे. आम्ही सर्व प्रकारच्या शक्यतांवर विचार करत आहोत, त्यानंतरच योग्य तो निर्णय घेतला जाणार असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.