Coronavirus : दिलासादायक ! राज्याचा Recovery Rate गेला 88 टक्क्यांच्या पुढे, दिवसभरात 16177 रुग्ण ‘कोरोना’मुक्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या आठ महिन्यांपासून कोरोनाशी (corona virus) झुंजणाऱ्या महाराष्ट्रासाठी गेल्या काही दिवसांपासून येत असलेली आकडेवारी काहीशी दिलासा देणारी आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 88 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. गुरुवारी दिवसभरात 16 हजार 177 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या ही 14 लाख 31 हजार 856 एवढी झाली आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 88.10 टक्के इतके आहे.

 

राज्यात दिवसभरात 7 हजार 539 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 16 लाख 25 हजार 197 इतकी झाली आहे. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 19.34 टक्के इतके आहे. याच दरम्यान 198 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 42 हजार 831 रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण 2.64 टक्के इतके आहे.

सध्या राज्यामध्ये 1 लाख 50 हजार 011 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आजपर्यंत राज्यात 84 लाख 2 हजार 559 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 16 लाख 25 हजार 197 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तर उर्वरीत जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. सध्या राज्यात 24 लाख 59 हजार 436 लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत. तर 24 हजार 621 लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

You might also like