Coronavirus : दिलासादायक ! राज्यात मात्र ‘कोरोना’ रुग्णसंख्या घटली

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   जगभरात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. आज राज्यात ४ हजार ४९६ कोरोना संसर्गित रुग्ण आढळून आले आहेत, तर १२२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज ७ हजार ८०९ रुग्ण बरे होऊ घरी सोडण्यात आले. राज्यातील एकूण कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या आता १७ लाख ३६ हजार ३२९ वर गेली आहे. त्यातील १६ लाख ५ हजार ६४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९२.४४ टक्के झाले आहे. सध्या राज्यातील ८४ हजार ६२७ रुग्णांवरती राज्यातील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत, तर आजवर ४५ हजार ६८२ जणांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९६ लाख ६४ हजार २७५ नमुन्यांपैकी १७ लाख ३६ हजार ३२९ नमुन्यांचा अहवाल सकारात्मक आला आहे. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण १७.९७ टक्के झाले आहे. आताच्या घडीला राज्यात ८ लाख ११ हजार ३५ जण घरगुती विलगीकरणात आहेत, तर ६ हजार ४८७ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.