Coronavirus : राज्यात गेल्या काही महिन्यातील सर्वात कमी रुग्ण वाढ, दिवसभरात 5984 नवे ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातला कोरोना रुग्णांचा चढता आलेख आता घसरणीला लागला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये या घसरणीत सातत्य असून त्यामुळे थोडा दिलासा मिळाला आहे. राज्यात सोमवारी (दि.19) गेल्या कित्येक महिन्यात सर्वात कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच मृत्यूच्या संख्येतही लक्षणीय घट झाल्याचे आढळून आलं आहे.

दिवसभरात राज्यात 5 हजार 984 रुग्णांची नोंद झाली तर 125 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही महिन्यापासून नव्या रुग्णांची संख्या ही 12 हजारांच्यावर राहात होती. तर मृत्यूचा आकडाही 300 च्या जवळ स्थिर झाला होता. आज मागील तीन महिन्यात सर्वांत कमी मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात आजपर्यंत 16 लाख 1 हजार 365 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 19.56 टक्के इतके आहे.

आज दिवसभरात 15 हजार 069 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 13 लाख 84 हजार 879 रुग्ण बरे झाले असून राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 86.48 टक्के इतके झाले आहे. तर गेल्या 24 तासात 125 रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्यात आतापर्यंत 42 हजार 240 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात मृत्यू होण्याचे प्रमाण 2.64 टक्के इतके झाले आहे. आजपर्यंत 81 लाख 85 हजार 778 नमुन्यांपैकी 16 लाख 01 हजार 365 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 24 लाख 14 हजार 577 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 23 हजार 285 लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.