दिलासादयक ! राज्यात गेल्या 24 तासात तब्बल 12326 ‘कोरोना’मुक्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. राज्यात गेल्या 24 तासामध्ये 12326 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यात कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 65.37 टक्के इतके झाले आहे. राज्यात तीन लाखांच्या जवळ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असल्याने दिलासा मिळाला आहे. रुग्ण बरे होत असताना रुग्णांची संख्या देखील वाढत आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यात 9 ते 10 हजाराच्या आसपास रुग्ण आढळून येत होते. आज रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण काहीसे कमी झाले आहे. गेल्या 24 तासात 7760 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4 लाख 57 हजार 956 इतकी झाली. रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 19.47 टक्के आहे.

राज्यात गेल्या 24 तासात 12326 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून अतापर्यंत 2 लाख 99 हजार 356 रुग्ण बरे झाले असून त्यांना दवाखान्यातून घरी सोडण्यात आले आहे. तर गेल्या 24 तासात 300 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून कोरोना महामारीमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 16 हजार 142 इतकी झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 3.52 टक्के इतका आहे. सध्या राज्यात 9 लाख 44 हजार 442 लोक होम क्वारंटाईन आहेत. तर 43906 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आतापर्यंत 23 लाख 52 हजार 047 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत.