Coronavirus : राज्यात ‘कोरोना’चा कहर ! गेल्या 24 तासात 12248 नवे पॉझिटिव्ह तर 390 जणांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाचा प्रादुर्भाव देशासह राज्यात अद्यापही झपाट्याने वाढताना दिसत आहे. राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 5 लाखांच्या पुढे गेली आहे. आज दिवसभरात राज्यात विक्रमी 12 हजार 248 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 5 लाख 15 हजार 332 वर पोहचली आहे. तर दिवसभरात 390 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1 लाख 45 हजार 558 इतकी आहे. तर आतापर्यंत 17 हजार 757 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. राज्यात आज 13348 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे. तर, आजपर्यंत राज्यात तब्बल 3 लाख 51 हजार 710 जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट वाढला आहे.

ऑगस्टच्या पहिल्या आठ दिवसांमध्ये देशात नवे कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आल्याने देशाची चिंता वाढली आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठ दिवसातील भारतातील कोरोना रुग्णांची आकडेवारी खूपच धक्कादायक आहे. ऑगस्टच्या 8 दिवसांत 4.55 लाख नवीन प्रकरण आढळून आली आहेत. सर्वाधिक प्रकरणांमध्ये अद्याप तरी भारत तिसऱ्या क्रमांकावर असला तरी नव्या प्रकरणांच्या बाबतीत भारत ऑगस्टमध्ये जगात पहिल्या क्रमांकावर आहे.