Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात 13408 जण झाले ‘कोरोना’मुक्त, पण….

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. राज्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या 24 तासात राज्यात तब्बल 13 हजार 408 रुग्ण बरे झाले असून त्यांना दवाखान्यातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत राज्यात 3 लाख 81 हजार 843 रुग्ण बरे झाले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 69.64 टक्के इतके झाले आहे.

राज्यात रुग्ण बरे होत असताना कोरोना बाधित रुग्णांमध्ये वाढ होत आहे. गेल्या 24 तासात राज्यात 12 हजार 712 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 5 लाख 48 हजार 313 एवढी झाली आहे. तर राज्याचा रुग्ण आढळून येण्याचा दर 18.84 टक्के इतका आहे. याच दरम्यान राज्यात 344 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यात आतापर्यंत 18 हजार 650 जणांचा कोरोनामुळे मृत्य झाला आहे. राज्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण 3.4 टक्के आहे.

राज्यात सध्या 1 लाख 47 हजार 513 रुग्ण ॲक्टिव्ह असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या राज्यामध्ये 10 लाख 15 हजार 115 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 35 हजार 880 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत राज्यात 29 लाख 08 हजार 887 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 5 लाख 48 हजार 313 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.