Coronavirus : ‘लॉकडाऊन’ असताना घराबाहेर पडला म्हणून सख्या भावाचा ‘खून’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे लोकांना घराबाहेर पडण्यास बंदी आली आहे. लॉकडाऊन दरम्यान लोकांनी घरातून बाहेर पडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. काही ठिकाणी विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. दरम्यान लॉकडाऊन असतानाही घराबाहेर पडल्याने सख्या भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

ही घटना मुंबईतील समता नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली आहे. समता नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश लक्ष्मी ठाकूर याने लॉकडाऊन आहे त्यामुळे घराबाहेर निघू नको असं वारंवार सांगूनही धाकटा भाऊ दुर्गेश याने न ऐकल्याने त्याचा खून केला. दुर्गेश हा पुण्यातील एका खासगी कंपनीत नोकरीला होता. कोरोनामुळे कंपनीतील कामकाज बंद असल्याने तो आपल्या घरी परतला होता.

लहान भाऊ दुर्गेश याला वारंवार सांगून देखील तो लॉकडाऊन दरम्यान बाहेर गेला. याचा राग राजेश याला आला. दुर्गेश बाहेरून घरी आल्यानंतर आरोपी आणि त्याच्या पत्नीने त्याच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. यानंतर आरोपीने धारदार शस्त्राने सपासप वार करून दुर्गेशचा खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली. जखमी झालेल्या दुर्गेशला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषीत केले. पोलिसांनी आरोपी राजेश विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

You might also like