Coronavirus Lockdown : ‘लॉकडाऊन’मध्ये ऑनलाइन जेवण मागवणं पडलं 50 हजारांना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –  जगभरातील सर्व देश कोरोना संसर्गाशी लढत आहे. भारताने वेळीच सावध होऊन पुकारण्यात आलेल्या २१ दिवसांच्या लॉकडाऊन मुळे कोरोना संसर्गामुळे होणारी हानी टाळता आली. परंतु देशाची सद्य स्थिती पाहता ३ मे पर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. मात्र लॉकडाऊन मध्ये अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवा वगळता सर्व गोष्टी बंद आहे. याच वेळी एका महिलेला ऑनलाइन जेवण मागवणं चांगलंच महागात पडलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घडलेली घटना मुंबईतील असून, लॉकडाऊन दरम्यान एका हॉटेलमधून ऑनलाईन जेवण मागवणं महिलेला चांगलंच महागात पडलं आहे. यामुळे महिलेला तब्बल ५० हजारांचा फटका बसल्याची माहिती मिळत आहे. एका ४९ वर्षीय महिलेने सोशल मीडियाच्या माध्यमातून एका हॉटेलची जाहिरात पहिली होती. त्यानंतर तिने या जाहिरातीच्या माध्यमातून मिळालेल्या क्रमांकावर फोन लावून जेवणाची ऑर्डर घेण्यास सांगितले.

दरम्यान, हॉटेलच्या कर्मचाऱ्याने एक लिंक पाठवतो त्यावर नाव, पत्त्यासह तुमची माहिती भरा कारण पुढच्यावेळी तुम्ही ऑर्डर करताना आम्हाला तुमचं नाव किंवा पत्ता विचारण्याची गरज पडणार नाही आणि काही मिनिटांत जेवणाची ऑर्डर मिळेल असं हॉटेलच्या वतीने महिलेला सांगितलं. महिलेने देण्यात आलेली लिंक ओपन केल्यावर तिला डेबिट कार्डची माहिती विचारण्यात आली. महिलेने संपूर्ण माहिती भरली. लगेचच हॉटेलमधून पुन्हा फोन आला आणि तुमच्याकडे एक चार अंकी नंबर कन्फर्मेशनसाठी येईल म्हणून सांगितलं.

त्यानंतर, महिलेने आलेला नंबर भरला व काय काय ऑर्डर पाहिजे ते सांगा असं सांगण्यात आलं. त्यावेळी महिला काय काय ऑर्डर करायचं याची लिस्ट पाहत असतानाच तिला फोनवरती एका मागून एक असे पाच मेसेज आले. त्यात तिच्या खात्यामधून ४९ हजार ९५४ रुपये काढण्यात आल्याची माहिती दिली. या सर्व प्रकरणानंतर आपली फसवणूक झाल्याचं महिलेच्या लक्षात आलं. त्यानंतर पोलीस ठाण्यात धाव घेतली. याबाबत महिलेने तक्रार केली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.