करोना व्हायरस : ‘मॅप’च्या माध्यमातून सायबर चोरी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – ऑनलाईन करोना व्हायरसची माहिती घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘करोना व्हायरसचा मॅप’च्या माध्यमातून सायबर चोरट्यांनी संगणकातील गोपनीय माहिती व पासवर्ड चोरला आहे. त्यामुळे करोना व्हायरसचा मॅप उघडू नका असे आवाहन पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर शाखेने केले आहे.

करोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातही करोना व्हायरसचे रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या धक्‍क्‍यातून नागरिक सावरलेले नाही. जगात कोठे कोठे करोना व्हायरसचे रुग्ण अधिक आहेत, याची माहिती अनेकजण संगणकावरून घेत असल्याचे दिसून आले आहे. याचाच फायदा सायबर चोरट्यांनी घेतला आहे.

करोना व्हायरसचा नकाशा ऑनलाइन टाकला आहे. हा नकाशा उघडताच संगणकातील माहिती सायबर चोरटे घेतात. त्यात आपला पासवर्डही चोरला जातो. यामुळे हा नकाशा कोणीही उघडू नका किंवा डाऊनलोडही करू नका, असे आवाहन पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे यांनी केले आहे.