कुटुंबियांचा जिव्हाळा अन् उपचाराने 93 वर्षीय आजीची कोरोनावर मात

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ठाकरे सरकारची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. असे असतानाच एक सकारात्मक माहिती समोर येत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील एका 93 वर्षाच्या आजीने कोरोनावर मात करून त्या सुखरूप घरी पोहचल्या आहेत. याचे श्रेय त्या घरातील सर्व सद्स्य व जिल्हा शासकीय रुग्णालय यवतमाळमधील सर्व स्टाफ व डॉक्टरांना दिले आहे.

प्रभावती काळीकर (वय 93, रा. नवीन पुसद, जि. यवतमाळ ) असे कोरोनावर मात केलेल्या आजीचे नाव आहे. कोरोना झाल्याने आजीना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. योग्य प्रकारे काळजी घेतल्याने कोरोनावर यशस्वीपणे मात करता आल्याचे आजीने म्हटले आहे. तसेच कोरोनाला घाबरू नका, या काळात सर्वांनी आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे. दरम्यान राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय आणि सरकारी पातळीवर मोठ्या हालचाली वाढल्या आहेत, दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत असल्याने चिंता वाढली आहे.