Coronavirus Vaccine : 50 % प्रभावी ठरली तरी देखील लोकांना देण्यात येणार ‘कोरोना’विरूध्दची लस

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   जगभरात कोरोना संसर्गाचे १९,५७५,७८३ रुग्ण आहेत. तर ७२४,७४७ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच १२,५७०,९९८ लोकांवर यशस्वीरीत्या उपचार करुन सोडून देण्यात आलं आहे. दरम्यान, कोरोनाची लस पूर्णरीत्या प्रभावी असण्याची (९८ टक्के) शक्यता कमी आहे. पण लस ५० टक्के प्रभावी असली तरी सुद्धा तिचा वापर करण्यात येईल असे मत, अमेरिकेचे कोरोना व्हायरस अ‍ॅडव्हायझर आणि देशातील मुख्य संसर्गजन्य रोग तज्ज्ञ अ‍ॅथनी फाउची यांनी मांडलं आहे.

ब्राउन युनिव्हर्सिटीच्या स्कुल ऑफ पब्लिक हेल्थच्या एका कार्यक्रमात फाउची बोलतं होते. ते म्हणाले, वैज्ञानिक ज्या लसीवर काम करत आहेत. ती किमान ७५ टक्के तरी प्रभावी व्हावी, अशी त्यांना आशा आहे. मात्र, लस ५० ते ६० टक्के प्रभावी असली, तरी तीचा स्वीकार केला जाणार आहे.कोरोनाची लस ९८ टक्के प्रभावी होण्याची शक्यता कमी आहे. लस एक टूल आहे, जिच्या सहाय्याने महामारीवर नियंत्रण मिळवता येईल. हा विचारही आपल्याला करावा लागेल.

अमेरिकेच्या फूड अ‍ॅड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने म्हटले आहे, की जर कोरोना लस सुरक्षित असल्याचे सिद्ध झाले आणि ती ५० टक्के जरी प्रभावी असली तरी तिला मंजुरी देण्यात येईल. मंजूरी मिळाल्यानंतर कोणतीही लस सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध होऊ शकते. अमेरिकेत अनेक लसींवर काम सुरू आहे. तसेच अनेक लसींची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. या चाचणींचे निकाल चांगले आल्यास ती सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होऊ शकते.

अमेरिकेत Pfizer आणि Moderna ची तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीसाठी ३० हजार लोकांचा समावेश करत आहे. अनेक तज्ज्ञांचे मत आहे, की या वर्षाच्या अखेरपर्यंत तिसऱ्या टप्प्यावरील चाचणीचे निकाल समोर येतील. दुसरीकडे रशियाने आपल्या लसीचे परीक्षण पूर्ण झाल्याचा दावा केला आहे. मात्र, या रशियन कोरोना लसीसंदर्भात फारशी माहिती समोर आलेली आहे. भारतातही कोरोना लसींवर वेगाने काम सुरू आहे.

तर WHOचे प्रमुख टेड्रोस अ‍ॅडहॅनम घेब्रियेसुस यांनी म्हटले आहे, की वैज्ञानिक चांगली आणि प्रभावी लस तयार करण्यात यशस्वी होतील, अशी आशा आहे. मात्र, खात्री नाही. असेही होऊ शकते, की यावरील लस तयारच होणार नाही.